प्रवासात किंवा कार्यक्रमात बिसलेरीचे पाणी पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरीच्या प्रकल्पातून घेतलेल्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नमुन्याची तपासणी केली. या तपासणीनंतर बिसलेरीच्या पाण्यात कॅन्सरला निमंत्रण देणारे घटक आढळून आल्याचे FSSAI च्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी पिताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
FSSAI च्या तपासणीत नेमके काय आढळले?
दोनदा केलेल्या चाचणीत बिसलेरीचे पाणी पिण्यास अयोग्य आणि असुरक्षित असल्याचे आढळून आले. पहिल्या तपासणीत आरोग्याला धोकादायक असलेल्या ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले. बिसलेरी कंपनीच्या आक्षेपानंतर केलेल्या दुसऱ्या चाचणीत पाण्यात PAHs हे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक आढळले. चाचणीसाठी पाण्याचे नमुने बाजारातून नाही, तर थेट बिसलेरी कंपनीच्या प्रकल्पातून घेण्यात आले होते. देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाण्याची कंपनी असलेल्या बिसलेरीवर FSSAI कडून कोर्टात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
बिसलेरी कंपनीचे स्पष्टीकरण
FSSAI च्या नोटीशीसंदर्भातल्या बातम्यानंतर बिसलेरीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, FSSAI कडून गोव्यातील कंपनीच्या उत्पादन केंद्रातून पाण्याच्या ६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५ नमुने गुणवत्ता तपासणीच्या सर्व निकषांवर योग्य ठरले. सहाव्या नमुन्याच्या प्राथमिक तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम आढळले. कंपनीचे बाटलीबंद पाणी पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
बाटलीबंद पाण्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे हे पाणी शुद्ध असल्याचे गृहीत धरून आपण बिनधास्त पित असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्याचे घातक परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता FSSAI च्या नोटीशीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी पिताना खबरदारी घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.
Leave a Reply