सकाळी पूर्ण चार्ज केलेला फोन दुपारपर्यंतच निम्मा होतो, असा अनुभव अनेकांना येतो. काही महिन्यांतच बॅटरी लवकर उतरू लागल्याची तक्रारही खूप जण करतात. यामागे फोनमधील बिघाड असण्यापेक्षा आपल्या चार्जिंगच्या चुकीच्या सवयीच जास्त कारणीभूत असतात. गुगल, ॲपल आणि सॅमसंग या कंपन्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रोजच्या वापरात फक्त पाच गोष्टींची काळजी घेतली, तर बॅटरी वारंवार उतरणार नाही आणि तिचे आयुष्यही वाढेल.
चार्जिंगची पद्धत बदला
अनेकजण बॅटरी शून्य टक्क्यांपर्यंत संपेपर्यंत फोन वापरतात आणि मग शंभर टक्के पूर्ण चार्ज करतात. गुगलच्या अधिकृत माहितीनुसार, लिथियम-आयन बॅटरी वारंवार शून्य ते शंभर टक्के अशा पूर्ण चक्रात चार्ज केल्यास तिच्या क्षमतेवर ताण येतो. त्यामुळे बॅटरी नेहमी 20 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान ठेवणे सर्वात चांगले मानले जाते. सॅमसंग आणि आयफोनमधील ‘बॅटरी प्रोटेक्शन’ किंवा ‘ऑप्टिमाइज्ड बॅटरी चार्जिंग’ हे वैशिष्ट्य सुरू ठेवल्यास फोन स्वतःच चार्जिंगचे नियोजन करतो.
बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे उष्णता. ॲपल आणि सॅमसंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्मार्टफोनसाठी 0 ते 35 अंश सेल्सिअस हे तापमान सर्वात सुरक्षित असते. थेट उन्हात फोन ठेवणे, चार्जिंगला लावून खेळ खेळणे किंवा जाड कव्हर लावून चार्ज करणे टाळावे. अतिउष्णतेमुळे बॅटरीच्या रासायनिक रचनेला कायमस्वरूपी नुकसान पोहोचते.
चार्जर, स्क्रीन आणि पार्श्वभूमीवरील ॲप्स
स्वस्त, अनधिकृत किंवा दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने फोन चार्ज केल्यास बॅटरीला अयोग्य व्होल्टेज मिळते. यामुळे बॅटरी फुगणे किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी फोनसोबत आलेला मूळ चार्जर आणि केबलच वापरावी. बॅटरीचा सर्वाधिक वापर स्क्रीनमुळे होतो, त्यामुळे ‘अडॅप्टिव्ह ब्राइटनेस’ सुरू ठेवावा आणि स्क्रीन टाईमआऊट 30 सेकंदांपर्यंत मर्यादित करावा. ओएलईडी किंवा अमोलेड स्क्रीन असलेल्या फोनमध्ये डार्क मोड वापरल्यास बॅटरीची मोठी बचत होते.
गरज नसताना वाय-फाय, ब्लूटूथ आणि लोकेशन सुरू ठेवल्यास फोन सतत नेटवर्क शोधत राहतो, त्यामुळे बॅटरी झपाट्याने उतरते. तसेच, पार्श्वभूमीला चालणाऱ्या अनावश्यक ॲप्ससाठी ‘अडॅप्टिव्ह बॅटरी’ किंवा ‘बॅटरी ऑप्टिमायझेशन’ हा पर्याय सक्रिय ठेवल्यास दिवसअखेरपर्यंत बॅटरी सहज टिकते. या पाच सवयी बदलल्या, तर नवीन फोन घेण्याची घाई करण्याची गरज भासणार नाही.
Leave a Reply