पुण्याच्या ओतूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. काळ आणि परिस्थिती बदलली असली, तरी शेतकऱ्यांच्या शोषणाची पद्धत अद्याप बदललेली नाही, असे ते म्हणाले. पूर्वी शेतकरी इंग्रजांच्या धोरणांविरोधात लढत होता. आजही धोरणे, परिस्थिती आणि मानसिकता तीच आहे; फक्त धोरण ठरवणारे पूर्वी गोरे इंग्रज होते आणि आता काळे इंग्रज आहेत, असा घणाघात शेट्टी यांनी केला.
पडीक शेती जप्तीच्या चर्चेवर टीका
तीन वर्षे शेती पडीक राहिली, तर ती सरकार जप्त करू शकते, असा कायदा येऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवरूनही शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. महसूल मंत्र्यांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, तीन वर्षे शेती पडीक ठेवल्यास ती जप्त करणार असाल, तर कोकणातील सर्व शेती जप्त करावी लागेल. पूर्वीच्या काळातील प्रस्थापितांची जागा आता अदानी आणि अंबानी यांनी घेतली आहे; त्यापलीकडे व्यवस्थेत कोणताही मूलभूत बदल झालेला नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले.
गटशेती आणि मुक्त व्यापार करारावर मत
तुकड्या-तुकड्यांच्या शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी गटशेती आणि कम्युनिटी फार्मिंगचा पर्याय स्वीकारण्याची गरज असल्याचे शेट्टी म्हणाले. दिल्लीत मुक्त व्यापार कराराच्या निर्णयाच्या हालचाली सुरू असून, या करारामुळे भारतीय शेतीसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते, तर भारतीय शेतकरी उणे सबसिडीवर शेती करत आहेत. भारतीय शेतकरी स्पर्धेला घाबरत नाही, मात्र अमेरिका आणि भारतातील शेतीची स्पर्धा समान पातळीवर असावी, असेही शेट्टी यांनी म्हटले.
Leave a Reply