कर्करोग हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. सर्वांत जीवघेण्या आजारांपैकी एक असणाऱ्या कर्करोगावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करत आहेत. अशातच आता स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील संशोधनाला मोठे यश मिळाले आहे. संशोधकांनी विकसित केलेले डाराक्सोनरासिब हे नवे औषध प्रमाणित केमोथेरपीसोबत दिल्यावर स्वादुपिंडाच्या कर्करोगाची गाठ आकुंचन पावण्यास आणि नष्ट होण्यास मदत होत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमधून समोर आले आहे.
चाचणीत समोर आलेले निकाल
या चाचणीत ६१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि सरासरी १८.३ महिने त्यांचे निरीक्षण करण्यात आले. ६०.७ टक्के रुग्णांमध्ये ट्यूमरचा आकार कमी झाला किंवा तो पूर्णपणे नष्ट झाला. ९०.२ टक्के रुग्णांमध्ये आजाराची वाढ थांबली, म्हणजेच गाठ एकतर लहान झाली किंवा स्थिर राहिली. ८.२ टक्के रुग्णांमध्ये तपासणीत ट्यूमर अजिबात दिसला नाही. या उपचारानंतर एका वर्षाच्या आत ७६.६ टक्के रुग्ण जिवंत राहिले. हे निकाल कर्करोगग्रस्तांसाठी दिलासादायक मानले जात आहेत.
तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा
मोठी प्रगती असली, तरी या औषधाला अद्याप कर्करोगावरील पूर्ण इलाज मानता येणार नाही, असा सावधगिरीचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ही चाचणी सुरुवातीच्या टप्प्यातील असून, त्यात रुग्णांची थेट केवळ केमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांशी तुलना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या निकालांची पुष्टी मोठ्या यादृच्छिक चाचणीतून होणे गरजेचे आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग अतिशय घातक मानला जातो, कारण गाठींमध्ये वाढ होईपर्यंत आणि शरीराच्या इतर भागात तो पसरेपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे या आजाराचे निदान होण्यास बराच उशीर होतो. मात्र, या नव्या औषधाच्या चाचणीतून आगामी काळात कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे असून, स्वादुपिंडाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.
Leave a Reply