खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्राकडे परतत असलेल्या भाविकांच्या वाहनाला राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील तीन कुटुंबे वेगवेगळ्या वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शन आटोपून परतत असताना त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि आत बसलेल्या प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
वाहनात १६ जण, बहुतांश एकाच कुटुंबातील
अपघातग्रस्त वाहनात एकूण १६ जण होते आणि ते सर्व धुळे जिल्ह्यातील होते. मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. ही दृश्ये पाहून मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांचेही पाय थरथर कापले, असे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
प्रशासनाची माहिती
कोट्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितले की शंभूपुरा जवळ मध्यरात्री १६ जणांना घेऊन जाणारे वाहन ट्रकवर आदळले आणि हा अत्यंत दुःखद अपघात होता. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि ते बरे व्हावेत हेच सध्या प्रशासनाचे प्राधान्य आहे. दरम्यान, मृतांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.
Leave a Reply