राज्यात आणि केंद्रात सरकार असताना भाजपला राजस्थानात जबर धक्का बसला आहे. डबल इंजिन सरकार असताना भाजपचा दारुण पराभव झाला आहे. मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंतच्या मतदारसंघांमध्ये भाजपला अपयश आले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यातील सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसने दमदार पुनरागमन केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे राज्यासह केंद्रातील मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभव पाहावा लागला आहे.
काँग्रेसचा डबल धमाका
भाजपचे डबल इंजिन सरकार असताना काँग्रेसने राजस्थानात डबल धमाका केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा दुप्पट जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह केंद्र आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात भाजपला विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे भाजपला ग्रामीण पट्ट्यात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. राजस्थानच्या ग्रामीण भागातील ४८ लाख मतदारांनी भाजपला तगडा झटका दिला आहे. मेवाड आणि मारवाडमध्ये काँग्रेसने दणदणीत कामगिरी केली आहे. जयपूर, जोधपूर, बिकानेर, भीलवाडा यासारख्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या शानदार कामगिरीचा फटका भाजपला बसला आहे.
जिल्हा परिषदांचे चित्र
राजस्थानच्या ३७ जिल्हा परिषदांमध्ये ४७५ सदस्य आहेत. तर ४१९ पंचायत समित्यांमध्ये ७,५४३ प्रभाग आहेत. एकूण ३७ जिल्हा परिषदांपैकी २५ वर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भाजपला केवळ ८ जिल्हा परिषदांमध्ये विजय मिळवता आला आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांना ३ जिल्हा परिषदांमध्ये आघाडी आहे. मागील वेळी राजस्थानात २९ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील १६ भाजपने, तर १० काँग्रेसने जिंकल्या होत्या. पण आता परिस्थिती अगदी उलट आहे. पंचायत समितींच्या ४१९ जागांपैकी काँग्रेसने २१३, तर भाजपने ८५ जागा जिंकल्या आहेत. तर अपक्षांनी ५६ पंचायत समित्यांमध्ये विजय मिळवला आहे. अजमेरमध्ये भाजपने विजय मिळवला. तर उदयपूरमध्ये भाजपने अटीतटीच्या लढतीत जागा राखली. चित्तौडगढ, सिरोही, राजसमंद आणि जालोर या भाजपच्या बालेकिल्ल्यांना काँग्रेसने खिंडार पाडत विजय साकारला आहे. ग्रामीण भागाने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकार विरोधात कौल दिला आहे. ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Leave a Reply