कोपर रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरू लागला होता, ज्यामध्ये अनेक प्रवासी रेल्वे रुळांच्या मधोमध बसून प्रवास करताना दिसत होते. हा प्रकार पाहून प्रवाशांच्या जीविताबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे प्रशासनाकडे तीव्र शब्दांत तक्रार नोंदवली आहे.
हा धोकादायक प्रकार मनसेचे विभागाध्यक्ष रितेश म्हात्रे यांनी व्हिडिओद्वारे उजेडात आणला होता. रुळांच्या मध्ये बसून प्रवास करणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी मनसेने केली आहे.
स्टेशन मास्तरांची भेट; निवेदन सादर
डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद हरिश्चंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोपर स्थानकातील स्टेशन मास्तरांची भेट घेतली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी त्यांनी सादर केले.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
येत्या आठ दिवसांत रेल्वे प्रशासनाने या प्रश्नावर प्रत्यक्ष उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी हर्षद पाटील यांनी केली आहे. तसे न झाल्यास स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाला मनसे स्टाईलने टाळे ठोकले जाईल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा धोकादायक खेळ थांबवण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेमुळे कोपर स्थानकातील प्रवासी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या वेळेत रेल्वे संरक्षण दलाने नियमित गस्त घालावी, रुळांवर उतरणाऱ्या प्रवाशांवर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, उद्घोषणांतून जनजागृती करावी आणि मेमू गाड्यांमधील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाय करावेत, अशी मागणी होत आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत, असे प्रवासी सांगत आहेत.
Leave a Reply