अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या मोठ्या पडद्यावर फारशी सक्रिय नसली तरी तिच्या प्रत्येक हालचालीवर चाहत्यांचे लक्ष असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडलेली राहते. आता तिने शेअर केलेल्या एका भावुक पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
मध्यरात्री ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला. फोटो थोडा अस्पष्ट असला तरी त्यातून कुटुंबातील आपुलकी स्पष्टपणे जाणवते. या फोटोसोबत तिने लेक आराध्या आणि आपल्या आई-वडिलांसाठी प्रेमळ शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसाच्या पाच दिवसांनंतर खास पोस्ट
आराध्याचा वाढदिवस १६ नोव्हेंबर रोजी होता. त्यानंतर पाच दिवसांनी ऐश्वर्याने ही पोस्ट शेअर केली. तिने आराध्याच्या लहानपणीचा फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. कॅप्शनमध्ये तिने वडील आणि आजोबांना उद्देशून शुभेच्छा देत आराध्याला आपली एन्जल म्हटले आहे.
चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
ऐश्वर्याची ही प्रेमळ पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चाहते तिच्यावर आणि आराध्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कमेंट विभागात अनेकांनी आराध्याला आशीर्वाद दिले आहेत. लहानपणापासून आतापर्यंत आराध्याच्या रूपात झालेला बदलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
ऐश्वर्याने एकेकाळी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. २००७ मध्ये तिचे अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न झाले. २०११ मध्ये तिला लेक आराध्या झाली. आज ती आपल्या खासगी आयुष्यात आनंदी असल्याचे दिसते.
Leave a Reply