साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची वेगळी शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरते. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या अंदाजाबद्दल अनेकदा बोलले जाते. आता जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या सत्काराच्या वेळी त्यांनी केलेली एक कृती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी उदयनराजे यांनी आपल्या ओळखीच्या मिश्कील आणि हलक्याफुलक्या शैलीत उंडाळकर यांचा सत्कार केला.
शाल आडवी धरून कानात कुजबुज
सत्काराच्या क्षणी उदयनराजे यांनी कॅमेऱ्यासमोर शाल आडवी धरली आणि उंडाळकर यांच्या कानात काहीतरी कुजबुज केली. त्यांची ही कृती पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरले नाही. काही क्षणांतच त्या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण तयार झाले.
त्यानंतर उदयनराजे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उंडाळकर यांचे अभिनंदन केले. बँकेच्या अध्यक्षपदाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
उदयनराजे यांच्या या अनोख्या सत्काराची चर्चा सध्या साताऱ्यात रंगली आहे.
Leave a Reply