राज्यात महायुतीची सत्ता असली तरी भंडाऱ्याच्या राजकारणात मित्रपक्षांनीच भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजपच्या सभापतींविरोधात आणलेला अविश्वास ठराव यशस्वी झाला असून शिंदे सेनेच्या आशू वंजारी यांची सभापतीपदी निर्विरोध निवड झाली आहे. या राजकीय उलथापालथीमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अडीच वर्षांनंतर सभापतिपदाचे आश्वासन आणि नाराजी
बाजार समितीच्या सत्तेत सहभागी होताना शिंदे सेनेला अडीच वर्षांनंतर सभापतिपद देण्याचे लेखी आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते, असा दावा शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. मात्र भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. याच नाराजीतून आणि आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संचालकांनी एकत्र येत भाजपच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.
१५-० मतांनी एकतर्फी निवड
१८ सदस्य संख्या असलेल्या भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे ३ सदस्य अनुपस्थित राहिले. या राजकीय खेळीचा फायदा घेत मित्रपक्ष आणि काँग्रेसच्या मदतीने सभापतीची निवड १५-० अशा एकतर्फी मतांनी झाली आणि शिंदे सेनेचे आशू वंजारी सभापतीपदी विराजमान झाले. समितीतील संख्याबळ असे आहे — भाजप ५, शिंदे सेना ४, राष्ट्रवादी ३, काँग्रेस ४ आणि अपक्ष २. राज्य पातळीवर भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र सत्तेत आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुका व सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी थेट काँग्रेसशी हातमिळवणी करत भाजपला शह दिला आहे. शब्द पाळला नाही, म्हणून सत्ता बदलली, असा संदेश यातून देण्यात आला असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर महायुतीसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.
Leave a Reply