बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात माधुरी दीक्षितसमोर हॉट सीटवर बसणार आहे. आपल्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तिने या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी माधुरीसोबत गप्पा मारताना शर्वरीने तिच्या सुरुवातीच्या काळातील अनेक रंजक आठवणींना उजाळा दिला.
२०२६ हे वर्ष ‘अल्फा’ आणि ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटांमुळे तिच्यासाठी अत्यंत खास ठरले आहे. आता ती ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात दिसणार आहे.
ऑडिशनमध्ये निवड झाली नाही, तेव्हा…
आपल्या करिअरमधील एक न उलगडलेला पैलू शेअर करताना शर्वरीने सांगितले की, ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटात अभिनयाची संधी हुकल्यानंतर तिने त्याच चित्रपटात वेगळ्या भूमिकेत काम करण्याची संधी शोधली. काम शिकण्याच्या जिद्दीने तिने दिग्दर्शक लव रंजन यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली तेव्हा कॅमेऱ्यासमोर अभिनय करणे म्हणजे काय किंवा रिटेक कसा असतो, याची तिला अजिबात कल्पना नव्हती, असे तिने सांगितले. ‘प्यार का पंचनामा २’साठी तिने ऑडिशन दिली होती, पण तिची निवड झाली नाही. त्यानंतर ती चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांच्याकडे गेली आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करता येईल का, असे तिने विचारले. त्यांनी तिला या कामाबद्दल काही माहिती आहे का, असे विचारले असता तिने प्रामाणिकपणे सांगितले की तिला यातले काहीही येत नाही. तरीही त्यांनी तिला कामावर ठेवले आणि सर्व काही शिकवले.
तीन चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक
त्यानंतर शर्वरीने ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या तीन चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. माधुरी दीक्षितसोबतच्या गप्पांमध्ये तिने तिच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अनुभवांचे अनेक किस्से शेअर केले आहेत. या विशेष भागात प्रेक्षकांना तिच्या प्रवासातील अनेक पैलू पाहायला मिळणार आहेत.
Leave a Reply