आसाममध्ये जन्मलेल्या एका सात आठवड्यांच्या हत्तीच्या पिल्लाला आता गुजरातमधील जामनगर येथे हलवले जाणार आहे. राजा असे या पिल्लाचे नाव असून, पायाचे हाड मोडल्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्याच्यावर अधिक चांगले आणि विशेष उपचार करता यावेत, यासाठी त्याला विशेष विमानाने वनतारा येथील हत्ती रुग्णालयात नेले जाणार आहे.
जन्मानंतर काही वेळातच पायाचे हाड मोडले
राजाचा जन्म २ ऑक्टोबर २०२६ रोजी आसाममधील गोगामुख येथे झाला. जन्मानंतर काही वेळातच त्याची अकरा वर्षांची आई घाबरली आणि तिने नवजात पिल्लाला लाथ मारली. त्यामुळे राजाच्या उजव्या मागच्या पायातील मांडीचे मोठे हाड पूर्णपणे मोडले. या दुखापतीमुळे त्याला उभे राहणे किंवा स्वतःचे वजन पेलणेही शक्य नव्हते. शिवाय नवजात पिल्लांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी आवश्यक असलेले आईचे पहिले दूधही त्याला मिळू शकले नाही.
पिल्लाची काळजी घेणाऱ्यांनी मदतीची विनंती केल्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी वनताराची पशुवैद्यकीय टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. डॉक्टरांनी क्ष-किरण तपासणीतून हाड मोडल्याची खात्री केली. त्यानंतर प्लास्टर आणि पट्ट्यांच्या साहाय्याने त्याचा जखमी पाय स्थिर करण्यात आला. १० ऑक्टोबर रोजी राजाला त्याच्या मालकाच्या पोहुमारा येथील निवासस्थानी हलवण्यात आले. तिथेही उपचार सुरू ठेवण्यात आले. जखमी पायावर वजन न पडता त्याला हालचाल करता यावी, यासाठी एक छोटा हायड्रोथेरपी तलावही तयार करण्यात आला.
प्रकृतीत अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या
मात्र, पुढील काळात राजाच्या प्रकृतीत अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या. त्याला अतिसार, जिवाणू संसर्ग, रक्तातील साखरेची पातळी वारंवार कमी होणे, यकृताशी संबंधित समस्या आणि बराच वेळ एकाच स्थितीत पडून राहिल्यामुळे शरीरावर जखमा झाल्या. याशिवाय नाभीच्या ठिकाणी हर्निया आणि सर्वसाधारण अशक्तपणाही आढळून आला.
वनताराने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, राजाला गुवाहाटीहून जामनगरला विशेष विमानाने नेले जाणार आहे. हा प्रवास सुमारे चार तासांचा असेल. रस्तेमार्गाने त्याला अडीच हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करावे लागले असते. पायाचे हाड मोडलेले असताना आणि प्रकृतीत अनेक गुंतागुंत असताना एवढा लांबचा प्रवास त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकला असता.
वनतारा संस्थेचे संस्थापक अनंत अंबानी यांच्या सहकार्याने राजाला विमानाने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने हत्तींना विमानाने हलवण्याची ही तिसरी मोहीम असल्याचे संस्थेने म्हटले आहे. राजाला विशेष पद्धतीने तयार केलेल्या पेटीत ठेवून विमानातून नेले जाणार आहे. या पेटीत त्याच्यासाठी खास मऊ गादीची व्यवस्था असेल, तसेच मोडलेल्या पायाला योग्य आधार दिला जाईल. संपूर्ण प्रवासादरम्यान पशुवैद्यकीय डॉक्टर आणि त्याची देखभाल करणारे कर्मचारी त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असतील. वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान करणी म्हणाले, “राजा या जगात तुटलेल्या पायासह आला, पण त्याची जिद्द मात्र कधीच तुटली नाही.”
जामनगर येथील वनतारा रुग्णालयात पोहोचल्यानंतर राजाची पुन्हा सविस्तर वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर हाडांवरील विशेष उपचार, पोषण आहार आणि पुनर्वसन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्याला झालेली दुखापत आणि प्रकृतीतील गुंतागुंत लक्षात घेता, त्याला आयुष्यभर पशुवैद्यकीय उपचार आणि नियमित देखरेखीची गरज भासू शकते, असे वनताराने स्पष्ट केले आहे. त्याच्या मोडलेल्या हाडाची जखम कितपत भरून येते आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवरील उपचारांना तो कसा प्रतिसाद देतो, यावर त्याच्या पुढील प्रकृतीचे भवितव्य अवलंबून असेल.
Leave a Reply