१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी देश हादरला होता. या हल्ल्यात २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांची नावे समोर आली होती. आता या तपासाशी संबंधित एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या खुलाशामुळे त्या काळातील एका महत्त्वाच्या घडामोडीकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.
फोनवरून थेट संवाद
त्यावेळी या प्रकरणाचा तपास माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी नीरज कुमार करत होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, दाऊद इब्राहिम शरण येण्यास तयार होता. मात्र त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या होत्या. या अटी पूर्ण करणे शक्य झाले नाही आणि त्यानंतर त्याच्याशी फोनवरून होणारे बोलणे थांबले, असे नीरज कुमार यांनी सांगितले.
नीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दाऊदचा जवळचा सहकारी मनीष लाला याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी मनीष लाला सिंगापूरमध्ये होता. तो मुंबईत परतल्यानंतर त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली. मनीष लालानेच एका गुप्त दूरध्वनीच्या माध्यमातून नीरज कुमार यांचे दाऊद इब्राहिमशी बोलणे घडवून आणले होते.
दाऊदने काय विचारले?
फोनवर बोलताना दाऊदने नीरज कुमार यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला खरेच वाटते का की मुंबईतील बॉम्बस्फोट मी घडवून आणले? जर तसे असते, तर टायगर मेमनप्रमाणे मीही माझ्या कुटुंबाला तिथून हलवले असते, पण मी तसे केले नाही, असे दाऊदने त्यांना सांगितल्याचे नीरज कुमार यांनी नमूद केले.
दाऊदने शरण येण्याची तयारी दाखवली होती, मात्र त्याच्या अटी मान्य होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पुढील बोलणी होऊ शकली नाहीत आणि संपर्कही थांबला, असे माजी अधिकाऱ्याने सांगितले. माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी यांच्या कार्यक्रमात बोलताना नीरज कुमार यांनी हे खुलासे केले.
Leave a Reply