धुळे शहरातील ट्रॅव्हल्स पॉइंट परिसरात अग्रवाल भवनाजवळ असलेले सुलभ शौचालय रात्री नऊ वाजताच बंद केले जात असल्याने महिला प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे शौचालय सकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत नियमितपणे सुरू ठेवावे, अशी मागणी सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपने महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे.
शिरपूर, शहादा आणि आसपासच्या भागांतून दररोज शेकडो प्रवासी धुळ्यात येत असतात. त्यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र संबंधित शौचालयाचे संचालक पाणी नसल्याचे कारण सांगून रात्री नऊ वाजताच शौचालय बंद करतात. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांना उघड्यावर आणि असुरक्षित ठिकाणी जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महिलांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणी
शौचालय सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत सुरू ठेवण्यासोबतच तेथे पाणी, स्वच्छता आणि वीज यांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सोय असावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या संचालकाऐवजी सक्षम नवीन संचालकाची नेमणूक करावी आणि व्यवस्था सुरळीत होईपर्यंत प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सिद्धार्थ पारेराव आणि प्रवीण सूर्यवंशी यांनी हे निवेदन महापालिकेला दिले. या मागणीवर महापालिका काय निर्णय घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply