राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाने नाशिक विभागात मोठी तपासणी मोहीम राबवली आहे. दोन ते १४ नोव्हेंबर या दोन आठवड्यांत विभागात एकूण ७७ तपासण्या करण्यात आल्या. या मोहिमेत सात आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले, तर बारा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एकूण ३३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून १९ नियामक कारवाया नोंदवण्यात आल्या आहेत.
## विनापरवाना उत्पादनावर कारवाई
नाशिक शहरातील सिडको भागात चार नोव्हेंबर रोजी एका निवासी जागेत विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून ४० हजार ३९७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कॉलेज रोडवरील व्ही. एस. न्यू फॅशन झोन येथे आयुर्वेदिक औषधाचे विनापरवाना उत्पादन सुरू होते. तेथून ५० लाख ३४ हजार ९६० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
## राज्यभरात ३१९ तपासण्या
राज्यभरात याच काळात ६० उत्पादन आस्थापना आणि २५९ विक्री आस्थापना अशा एकूण ३१९ तपासण्या करण्यात आल्या. त्यात एकूण ११४ नियामक कारवाया झाल्या असून १३७ नोटिसा बजावण्यात आल्या. राज्यभरात २८ परवाने रद्द तर ८६ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
नाशिक विभागात ज्या आस्थापनांचे परवाने रद्द झाले त्यात इंडिया केमिकल्स लि. (वांबोरी, ता. राहुरी), आदितेज फार्मास्युटिकल (वडाळा, ता. नेवासा), आधार रक्तपेढी (संगमनेर), श्रीराम मेडिकल (भुसावळ), साई संकेत फार्मसी, मुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (कोपरगाव), आयुष मेडिकल आणि जय शंकर मेडिकल (ढोरजळगाव, ता. शेवगाव) यांचा समावेश आहे. सेवा मेडिकल (लोहारा, ता. पाचोरा), राजा मेडिकल (चाळीसगाव), संजीवनी मेडिकल (अंधारी), वसुंधरा मेडिकल (रावेर), दवा इंडिया हेल्थ मार्ट लि. (जळगाव), गुरू मेडिकल (पाचोरा), जनऔषधी मेडिकल, आनंद मेडिकल (पाचोरा), धन्वंतरी मेडिकल (जळगाव), श्री गुरुदत्त मेडिकल (करजुले, ता. संगमनेर), राज मेडिकल (चास नळी, ता. कोपरगाव) आणि साई तनिष्का मेडिकल (शिर्डी) यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ कायद्यांतर्गत दोन गुन्ह्यांत तिघांना अटकही करण्यात आली आहे.
Leave a Reply