ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स संसदेत एका खासदाराने आपल्या समारोपाच्या भाषणादरम्यानच आपल्या प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि सभागृहासमोरच तिने होकार दिला. या अनोख्या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सभागृहातच अंगठी काढून प्रस्ताव
लिबरल पार्टीचे खासदार जॉर्डन लेन हे सभागृहात मध्यवर्ती मेजाजवळ उभे राहून भाषण करत होते. ‘स्पीकर महोदय, राइडचा सदस्य म्हणून माझा शेवटचा प्रश्न माझ्या आयुष्यातील प्रेम नताली हिला आहे,’ असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी खिशातून अंगठी काढली आणि प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या नतालीजवळ जाऊन ‘तू माझ्याशी लग्न करणार का?’ असा सवाल केला. नतालीने आनंदाने प्रस्ताव स्वीकारला. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मात्र नंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला आणि त्यानंतर पुन्हा टाळ्या वाजल्या.
त्यानंतर जॉर्डन यांनी मिश्किलपणे सांगितले की, सभागृहाच्या अधिकृत नोंदीत हे राहावे अशी त्यांची इच्छा आहे की तिने होकार दिला आहे. यावर न्यू साऊथ वेल्स विधानसभेचे स्पीकर ग्रेग पाइपर यांनी ५८ वी संसद प्रेमाची संसद म्हणून ओळखली जाईल, अशी मिश्किल टिप्पणी केली.
दहा वर्षांचे नाते, राजकारणातून निवृत्ती
जॉर्डन आणि नताली गेल्या दहा वर्षांपासून नात्यात आहेत. ३२ वर्षीय जॉर्डन लेन पहिल्यांदाच लिबरल पार्टीच्या तिकिटावर निवडून आले होते आणि राइड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. ६ नोव्हेंबर रोजी त्यांनी राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. राजकारणात असताना वैयक्तिक आयुष्यावर त्याचा खूप परिणाम झाला, असे त्यांनी सांगितले होते. मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या आधीच त्यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांनी न्यू साऊथ वेल्सच्या संसदेत समारोपाचे भाषण दिले आणि तेच भाषण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरले.
Leave a Reply