नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेची मान्यता तपासा, असा आयोगाचा सल्ला आहे. बनावट विद्यापीठे आणि बेकायदेशीर शैक्षणिक संस्थांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक फसवणूक टाळणे, हा या इशाऱ्यामागील उद्देश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आवाहन
सर्वोच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी या संदर्भात निर्देश दिले होते. रिट याचिका (नागरी) ५३१/२०२५ या प्रकरणातील निर्देशानंतर आयोगाने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना हे आवाहन केले आहे. संस्थांच्या दाव्यांची सत्यता तपासल्याशिवाय प्रवेश घेऊ नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
प्रवेशापूर्वी काय तपासावे?
प्रवेश घेण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणे गरजेचे आहे. ती संस्था कायद्याने स्थापन झाली आहे का, तिला तो अभ्यासक्रम चालवण्याचा आणि पदवी देण्याचा अधिकार आहे का, तसेच यूजीसी आणि इतर सरकारी संस्थांची मान्यता आहे का, हे तपासावे. तो कोर्स, शिकवण्याची पद्धत आणि केंद्र यांना परवानगी आहे का, हेही पाहावे. विशेषतः ऑनलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, ऑफ-कॅम्पस अभ्यासक्रम आणि स्टडी सेंटर यांची वैधता तपासणे आवश्यक आहे. संस्थांच्या जाहिरातींवर, संकेतस्थळांवर, माहितीपत्रकांवर आणि सोशल मीडियावरील दाव्यांवर केवळ विश्वास ठेवू नका, असा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठांची अधिकृत यादी आणि बनावट विद्यापीठांची यादी यूजीसीच्या www.ugc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आयोगाचे अधिकारी सुदीप सिंह जैन यांनी विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी या याद्यांची पडताळणी करावी, असे आवाहन केले आहे.
Leave a Reply