सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील राजकीय मतभेद समोर येत असतानाच, मंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत सूचक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढलो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे महायुतीकडेच गेली आहेत. त्यामुळे महायुतीच्या दृष्टीने हा निर्णय योग्यच आहे, असे सांगत त्यांनी राजकीय समीकरणांवर भाष्य केले.
जिल्हा परिषदेतील जखमांवर सूचक विधान
मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या संघर्षातून निर्माण झालेल्या राजकीय जखमांबाबत विचारले असता देसाई यांनी दिलेले उत्तर अधिकच बोलके ठरले. काही जखमा लवकर बऱ्या होत नसतात. त्यासाठी जालीम उपाय करावा लागतो, असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे संकेत मिळत आहेत.
बँकेच्या सत्तावाटपात भाजपला अपेक्षित स्थान न मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्रितपणे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची समीकरणे जुळविल्याने भाजपसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे.
आगामी राजकारणावर पडसाद?
देसाई यांच्या जालीम उपायांच्या विधानाचा नेमका रोख कोणाकडे, याबाबत त्यांनी स्पष्ट भाष्य केले नसले, तरी आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीतील वरकरणी एकजूट आणि पडद्यामागील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
Leave a Reply