सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. निवडीच्या वेळी नवरदेवाप्रमाणे मिरवणारे आता चीनला गेल्याचा टोला पडळकर यांनी लगावला.
एकहाती कारभाराला भाजपचे आव्हान
बँकेतील सत्तेचे केंद्रीकरण चुकीचे असल्याचे सांगत पडळकर यांनी एकहाती कारभाराला भाजप आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय झाला तर त्याला ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना महेंद्र लाड चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार चालवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र मागील काळाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कारभार झाला तर भाजप गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले. जयंत पाटील यांच्या एकहाती कारभाराला आता काँग्रेसही आव्हान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
निवडणुका आणि कर्जपुरवठ्यावरून टीका
निवडणुका घ्यायची वेळ आली की दुष्काळाचे कारण पुढे करायचे आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची वेळ आली की चर्चेलाच बगल द्यायची, असा दुटप्पी कारभार सर्वांनी पाहिला असल्याचे पडळकर म्हणाले. जयंत पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला असून बँकेचा कारभार यापुढे ठरावीक लोकांच्या हातात केंद्रित राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कर्जपुरवठ्याबाबत बोलताना पडळकर म्हणाले, बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना विविध प्रकारची कर्जे मिळतात; मात्र तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी वैयक्तिक लाभाची कर्जे मिळाली पाहिजेत. युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. संचालक झाल्यामुळे बँकेच्या कारभाराची अधिकची कागदपत्रे मिळवणे आता सोपे होणार असल्याचे सांगत, मी स्वतः कोणतेही बँकेचे कर्ज घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माझी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल. बँकेचा कारभार चांगला चालवण्यासाठी सहकार्य करू; मात्र शेतकरीहिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांना विरोधही करू, असे त्यांनी सांगितले. प्रस्थापितांच्या हातातून विस्थापितांच्या हातात कारभार येणे हे भाजपचे यश असल्याचा दावाही त्यांनी केला.
Leave a Reply