सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतले एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. या दोघांची प्रेमकहाणी अनेकदा ऐकली गेली आहे. पण सुप्रियाआधी सचिन एका अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, हे फार कमी जणांना माहीत असेल. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कमल हसन यांची पूर्वाश्रमीची पत्नी आणि सचिन यांची सहकलाकार सारिका या होत्या.
१९७५ मध्ये ‘गीत गाता चल’च्या सेटवर भेट
१९७५ साली ‘गीत गाता चल’ या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सारिका यांची भेट झाली. त्यावेळी सचिन केवळ १८ वर्षांचे होते. फार कमी जणांना माहीत असेल की सारिका या मूळच्या मराठी आहेत. सारिका यांचे आडनाव ठाकूर, त्यांची आई राजपूत होती आणि वडील सावंत होते. सारिका यांचे आई-वडील एकत्र राहत नव्हते. त्या लहान असतानाच त्यांची आई त्यांना घेऊन बाहेर पडली होती.
‘गीत गाता चल’मधील सचिन-सारिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. सचिन-सारिका ही जोडी धर्मेंद्र-हेमामालिनी यांच्या जोडीइतकीच लोकप्रिय झाली. दोघांनी एकत्र सुमारे आठ-दहा चित्रपट केले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले, हे त्यांनाही कळले नाही. या यशाच्या लाटेवर सचिन यांनी राजबाबूंना एका नवीन चित्रपटाची कल्पना सुचवली, जी ‘लव्ह स्टोरी’ या इंग्रजी चित्रपटावर आधारित होती. या चित्रपटात एका तरुण जोडप्याचे प्रेम, त्यांचा लग्नाचा निर्णय आणि नायिकेला कर्करोग झाल्याचे कळून तिचा मृत्यू होण्याची हृदयस्पर्शी कथा होती. सचिन यांना ही कथा इतकी आवडली की त्यांनी राजबाबूंना तशीच कथा मराठी चित्रपटात उतरवण्याची विनंती केली. राजबाबूंनी या कल्पनेला होकार देताना सांगितले, “ही कथा चांगली आहे, पण ती हिरोइन ओरिएन्टेड असेल.” सचिन यांनी लगेच उत्तर दिले, “होऊ दे ना! काम तर सारिकाच करणार आहे. मग काय हरकत आहे?” त्यांच्या या आत्मविश्वासामुळे ‘अखियों के झरोकों से’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली.
आईचा विरोध आणि वेगळे वाटे
मात्र, याच काळात सचिन आणि सारिका यांच्या नात्यामध्ये अडथळे येऊ लागले. त्याच वेळी ‘गोपालकृष्ण’ या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, ज्यामध्ये दोघेही काम करत होते. या चित्रपटाचे काही शूटिंग आणि एका गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. पण सेटवर काहीतरी गडबड असल्याचे सचिन यांच्या लक्षात येत होते, तरी त्याचे नेमके कारण त्यांना समजत नव्हते. प्रत्यक्षात, सारिका यांच्या आईला सचिन-सारिका यांचे नाते मान्य नव्हते. त्या दोघांच्या जवळीकतेमुळे सारिका यांच्या करिअरवर परिणाम होईल, असे त्यांच्या आईचे मत होते. याच कारणाने त्यांनी राजश्री प्रॉडक्शन्सच्या कार्यालयात जाऊन सचिन यांना चित्रपटातून काढण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “आम्हाला सचिनसोबत काम करायचे नाही. तुम्ही त्याला बदला.”
राजबाबूंनी या मागणीला स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, “सचिन यांच्याबद्दल कुणीही तक्रार केलेली नाही. जर सारिकाला काम करायचे नसेल, तर ती सांगू शकते. आम्ही दुसरी नायिका घेऊ.” यावर सारिका यांच्या आईने ठामपणे सांगितले, “मग दुसरी नायिका घ्या. आम्हाला काम करायचे नाही.” या मतभेदांमुळे सारिका यांना ‘गोपालकृष्ण’मधून बाहेर पडावे लागले. सचिन यांनी या प्रकरणात कोणतीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी राजबाबूंना सांगितले, “सारिकाला चित्रपट सोडायचा असेल, तर माझी हरकत नाही. पण री-शूटमुळे खर्च वाढेल, हे लक्षात ठेवा.” सारिका यांच्या जागी झरीना वहाब यांची निवड झाली, पण ‘गोपालकृष्ण’ हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही.
दरम्यान, ‘अखियों के झरोकों से’चे काम पुढे सरकत होते. या चित्रपटात रंजिताने मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट ‘गोपालकृष्ण’च्या आधी प्रदर्शित झाला आणि प्रचंड यशस्वी ठरला. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, या यशाच्या आनंदातही सचिन आणि सारिका यांचे नाते वेगळे होण्याच्या मार्गावर होते. सारिका यांच्या आईच्या विरोधामुळे आणि राजश्री प्रॉडक्शन्सशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक नाते तुटले. तरीही, सचिन आणि सारिका यांनी त्यांच्यातील आदर आणि मैत्री कायम ठेवली, जी पुढील काळातही टिकून राहिली.
सचिन आपल्या या नात्याबद्दल बोलताना म्हणतात की, सारिका आणि माझ्यात वरवरचे प्रेम किंवा आकर्षण नव्हते. आमचे एकमेकांवर खरेखुरे प्रेम होते. ते म्हणतात, हे कायम लक्षात राहणारे नाते होते. तरीही आमच्यात शारीरिक जवळीक कधीच नव्हती. याचे मूळ कारण हे आम्हाला एकमेकांशी लग्न करायचे होते. आमचे नाते हे एकमेकांबद्दलच्या आदरावर आणि प्रेमावर उभे होते, फक्त तारुण्यातील आकर्षणावर नव्हे.
Leave a Reply