बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठीही ओळखली जाते. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तिने २०१५ मध्ये ‘द लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन’ची स्थापना केली होती. आता या फाउंडेशनशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
आयुष्मान भारत योजनेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. इंदु भूषण यांची फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेल्या डॉ. भूषण यांना सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सेवा व्यवस्थेचा चार दशकांहून अधिक अनुभव आहे. फाउंडेशन आपल्या कार्याच्या दुसऱ्या दशकात प्रवेश करत असताना ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
डॉ. इंदु भूषण यांचा कार्यप्रवास
डॉ. भूषण यांचा कार्यप्रवास भारतीय प्रशासकीय सेवा, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक अशा विविध महत्त्वाच्या संस्थांपर्यंत विस्तारलेला आहे. आशियाई विकास बँकेत त्यांनी महासंचालक म्हणून काम पाहिले आणि चीनसह आशियातील विविध अर्थव्यवस्थांशी संस्थेचे संबंध दृढ करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. २०१८ मध्ये त्यांची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांनी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची रूपरेषा तयार करण्यापासून ते तिच्या प्रभावी संचालनापर्यंत महत्त्वाचे योगदान दिले. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनच्या अंमलबजावणीचे नेतृत्वही त्यांनी केले; या मिशनचे पुढे आयुष्मान भारत डिजिटल मिशन असे नामकरण करण्यात आले.
फाउंडेशनच्या कामाला नवी दिशा
या नियुक्तीबद्दल दीपिका पादुकोण यांनी आनंद व्यक्त केला असून डॉ. भूषण यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फाउंडेशनला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्याम भाट यांनीही या नियुक्तीचे स्वागत केले आहे. त्यांच्या मते, भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मानसिक आरोग्याचा अधिक प्रभावी समावेश होणे आवश्यक आहे आणि मोठ्या आरोग्य योजना उभारण्याचा डॉ. भूषण यांचा अनुभव फाउंडेशनच्या भविष्यातील कामासाठी उपयुक्त ठरेल. डॉ. भूषण यांनीही या नव्या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त केले असून भारतातील मानसिक आरोग्य व्यवस्था अधिक सुलभ आणि समानतापूर्ण बनवण्यासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करण्यास ते उत्सुक असल्याचे सांगितले.
२०१५ मध्ये स्थापन झाल्यापासून हे फाउंडेशन भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात जनजागृती आणि सेवा विस्तारासाठी काम करत आहे. त्याचा ग्रामीण समुदाय मानसिक आरोग्य कार्यक्रम सध्या कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. या उपक्रमातून १८ जिल्ह्यांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या ३० हजारांहून अधिक व्यक्ती आणि त्यांच्या काळजीवाहकांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. ‘#NotAshamed’ आणि ‘Dobara Poocho’ यांसारख्या देशव्यापी मोहिमांद्वारे मानसिक आरोग्याविषयी समाजात सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Leave a Reply