जगात धार्मिक लोकसंख्येच्या आलेखात बदल होणार आहे. प्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्च सेंटरने याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार २०३५ पर्यंत जगात इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांची संख्या ख्रिश्चन धर्मियांपेक्षा वाढणार आहे. इस्लाम अनुयायांची संख्या बहुसंख्य असेल. प्यू रिसर्च सेंटर गेल्या २५ वर्षांपासून धर्माच्या आधारावर जागतिक लोकसंख्येचा अभ्यास करत आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये इतर धर्मियांचा टक्का घसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
आकडेवारीतील दावा काय?
या अहवालानुसार जगात इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांच्या अनुयायांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पण मुस्लिम लोकसंख्या वाढीच्या दरात लक्षणीय बदल दिसत आहे. २०२० मध्ये जगात सुमारे २२७ कोटी ख्रिश्चन आणि २२० कोटी मुस्लिम होते. नव्या दाव्यानुसार २०३५ पर्यंत जागतिक मुस्लिम लोकसंख्या २५७ कोटींपर्यंत पोहोचू शकते. तर ख्रिश्चनांची संख्या २५२ कोटी इतकी असेल. असाच कल कायम राहिला, तर २०७० पर्यंत जगात मुस्लिमांची लोकसंख्या ३६० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तर ख्रिश्चन अनुयायांची लोकसंख्या ३०० कोटींच्या घरात असेल.
नास्तिकांची संख्या लक्षणीय वाढणार
या अभ्यासात अजून एक बाब समोर आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याही धर्माशी संबंध न ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा लोकांना संशोधनात नोन्स असं म्हटलं आहे. चीनचा अपवाद वगळता जगातील इतर देशांमध्ये अशा धर्मनिरपेक्ष आणि नास्तिक लोकांची संख्या २०७० पर्यंत १८ कोटींहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे.
अमेरिका आणि कॅनडात ख्रिश्चन घटणार
पाश्चात्य देशांमध्ये कोणताही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. अहवालानुसार येत्या ४० वर्षांत अमेरिकेत ख्रिश्चन बहुसंख्य नसतील. सध्या अमेरिकेच्या लोकसंख्येत ख्रिश्चन धर्मियांची टक्केवारी ६२ टक्के आहे. २०६५ पर्यंत हा आकडा ५० टक्क्यांच्या खाली येऊ शकतो. तर कॅनडा या देशातही २०३० पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हिंदूंची संख्या घटणार
भारत आणि जगभरातील हिंदूंची एकूण लोकसंख्या २०२० मध्ये १.२ अब्ज इतकी होती. इतर धर्मियांच्या लोकसंख्येचा वेग पाहता हिंदूंची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. अहवालातील दाव्यानुसार २०७० पर्यंत ही संख्या १.४ अब्ज इतकीच वाढणार आहे. तर येत्या काही दशकांपर्यंत हिंदू भारतात बहुसंख्य असतील, पण धार्मिक परीघ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Leave a Reply