मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला रस्त्यांच्या स्वच्छतेवरून फटकारलं आहे. व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात, असा संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. सामान्य मुंबईकरांसाठी रस्ते दररोज स्वच्छ का नसतात, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. तुमची इच्छा असेल तर क्षणात परिस्थिती बदलू शकते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. केवळ दोन दिवसांचा देखावा न करता कायमस्वरूपी सुधारणा करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सामान्य माणसासाठी काम करा
शाही पाहुण्यांसाठी रस्त्यांवर स्वच्छता होते, पण मुंबईकरांसाठी कचऱ्याचं साम्राज्य, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने महापालिकेची खरडपट्टी केली. मुंबईतील रस्ते केवळ महत्त्वाच्या व्यक्ती किंवा राजघराण्यातील व्हीआयपींच्या भेटीच्या वेळीच चकाचक केले जात असल्यावरून न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं. सामान्य नागरिकांसाठी अशी स्वच्छता अथवा चकाचक रस्ते दररोज का नसतात, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
इच्छा असेल तर क्षणात परिस्थिती बदलू शकेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्य सरकार आणि महापालिकेकडे इच्छा असेल, तर ते काही क्षणांत परिस्थिती बदलू शकतात, हे मतप्रदर्शन आम्ही अनुभवातून करत आहोत. बदल अत्यंत वेगाने घडू शकतात. मग काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती शहरात येणार असतील, तेव्हाच तुम्ही सक्रिय का होता? हे योग्य नाही. तुम्हाला या शहराचे कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या सामान्य माणसासाठी काम करावं लागेल, असं न्यायालयाने सुनावलं. दोन दिवसांचा हा तात्पुरता देखावा करण्याऐवजी कायमस्वरूपी सुधारणा करण्याचे न्यायालयाने सुनावले.
बॅलार्ड इस्टेट परिसर चकाचक
दक्षिण मुंबईतील ‘बॅलार्ड इस्टेट’ येथे काही महत्त्वाचे पाहुणे या परिसराला भेट देणार असल्याने तो परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेण्यात आला होता. मुंबईत काही दिवसांपूर्वी ब्रिटनचा राजकुमार विल्यम आणि राजकुमारी केट मिडलटन आले होते. अर्थशॉट प्राइज पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते पोहोचले होते. व्हीआयपी पाहुणे तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीदरम्यान राजकुमार विल्यम यांनी मुंबईच्या रस्त्यावर खेळाचा आनंद लुटला. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांनी क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरसह गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
Leave a Reply