रस्ते मार्गाने प्रवास करताना टोल नाका आला की तुम्ही न थांबता टोल भरता. पण टोल नाका पार करताच तुमच्या मोबाईलवर एक संदेश येऊ शकतो. तो तुमच्या वाहनाच्या विम्याशी संबंधित असेल. तुमच्या वाहनाचा थर्ड पार्टी विमा संपला असेल किंवा तुम्ही विमाच काढला नसेल, तर याची माहिती तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून मिळेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासाठी एक नवी यंत्रणा सुरू केली आहे. याची चाचणी दिल्लीतील एका टोल नाक्यावर सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर हीच यंत्रणा लागू करण्याची तयारी सुरू आहे.
चाचणी कुठे सुरू आहे?
एनएचएआयने दिल्लीतील अर्बन एक्सटेंशन रोड-दोनवरील मुंडका टोल नाक्यावर या यंत्रणेची चाचणी सुरू केली आहे. सध्या या यंत्रणेवर प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. यंत्रणेत सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. वाहनचालकांना वेळेवर विमा नूतनीकरण करण्यासंदर्भात जागरूक करण्याच्या उद्देशाने ही यंत्रणा आणली जात आहे.
संदेश कसा येणार?
या प्रक्रियेत टोल नाका आणि वाहन पोर्टल यांच्यातील माहिती सामायिक केली जाईल. एखाद्या वाहनाने टोल नाका ओलांडताच त्याची माहिती नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरच्या वाहन डेटाबेसवर पाठवली जाईल. यानंतर वाहनाची विमा वैधता आपोआप तपासली जाईल. वाहनाचा थर्ड पार्टी मुदत विमा संपल्याचे किंवा वाहनाचा विमाच नसल्याचे तपासणीनंतर समोर आल्यास वाहन मालकाच्या मोबाईलवर लगेच एसएमएस पाठवला जाईल. या संदेशात गाडीचा नोंदणी क्रमांक, टोल नाका ओलांडण्याची वेळ आणि विम्याच्या समाप्तीची माहिती असेल. सोबतच वाहन मालकाला विमा नूतनीकरण करण्याचा सल्लाही दिला जाईल.
या संदेशाच्या माध्यमातून वाहन मालकाला मोटर वाहन कायद्याअंतर्गत आकारल्या जाणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी वेळेत विमा काढण्याची आठवण करून देण्यात येईल. म्हणजे हा संदेश एका प्रकारे स्मरणपत्रासारखा काम करेल.
दंड किती?
भारतात थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे. मात्र तरीही अनेक वाहने वैध विम्याशिवाय रस्त्यावर धावतात. रस्ते अपघात झाल्यावर अशा वाहनांमधील प्रवाशांना नुकसानभरपाई मिळणे अवघड जाते. हीच समस्या लक्षात घेऊन एनएचएआयने नवी यंत्रणा आणली आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमा नसलेले वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यावर वाहन मालकाला मूळ विमा हप्त्याच्या तिप्पट रक्कम किंवा पाच हजार रुपये, यापैकी जास्त असेल ती रक्कम, दंड म्हणून भरावी लागते. दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास मूळ हप्त्याच्या पाचपट रक्कम किंवा दहा हजार रुपये, यापैकी जास्त असलेली रक्कम, दंड म्हणून भरावी लागते.
Leave a Reply