शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी एका पुस्तकावर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आरोपावरून विरोधकांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान, शायना एनसी यांनी आपण बाळासाहेबांचा फोटो फाडला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शायना एनसी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मुलायमसिंह यादव आणि मणिशंकर अय्यर यांचे फोटो फाडले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडलेला नाही. बाळासाहेब हे आमचे दैवत असून त्यांचे विचार पुढे घेऊन आम्ही चालतो, त्यामुळे त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे यांनी काय सांगितले?
बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांचा अपमान कुणीही शिवसैनिक करू शकत नाही आणि करणारही नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शायना एनसी यांनी याबाबत लगेचच स्पष्टीकरण दिले असून त्यांनी तो फोटोही दाखवला आहे. तो फोटो बाळासाहेब मणिशंकर अय्यर यांना चप्पल जोडे मारतानाचा आहे. फाटलेल्या फोटोत मणिशंकर अय्यर यांचा चेहरा फाटला आहे. शायना एनसी यांनी आपल्याला तो फोटो दाखवल्याचे शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेबांचा अवमान शायना एनसी असोत किंवा कुणीही शिवसैनिक, कदापि होऊ शकणार नाही. कारण बाळासाहेब आमचे दैवत आहेत आणि त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळेच जनतेने आम्हाला निवडून दिले, असे शिंदे म्हणाले. खोटे आरोप करून विरोधक बदनाम करण्याचे काम करत असतील, तर महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. फोटोवरून राजकारण करण्यासारखे काही नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पुस्तक का फाडले?
सोनिया गांधी यांच्या पुस्तकात सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. त्या पुस्तकात सावरकरांना माफीवीर असे म्हटले आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असे शिंदे म्हणाले. यापूर्वी राहुल गांधी यांनीदेखील सावरकरांचा वारंवार अपमान केला आहे. जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान करण्याचे पाप राहुल गांधी यांनी केले, असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी यांच्या पुस्तकातही सावरकरांचा अपमान करणारी वाक्ये असून दोन पानांवर त्यांना माफीवीर म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेने याचा निषेध केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत बसणारे स्वतःला सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेतात, त्याबद्दल त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. अशा लोकांनी त्या पुस्तकाचा स्वीकार केला, पण त्यातील अपमानास्पद वक्तव्यांबद्दल साधा निषेधही केला नाही, असे शिंदे म्हणाले. बौद्धिक दिवाळखोरी कुणाची आहे, असा सवाल त्यांनी केला. सावरकरांनी देशासाठी जे केले ते सर्वश्रुत आहे. त्यांचा अपमान करणाऱ्यांना जनतेने तीन वेळा घरी बसवले, असा टोलाही त्यांनी लगावला.
Leave a Reply