हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात एका भीषण अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. बारशाच्या कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळली. मृतांपैकी चार जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
मंडी जिल्ह्यातील जोगेंद्रनगरमधील सिमस भागात मंगळवारी रात्री हा अपघात झाला. मात्र अपघाताची माहिती बुधवारी दुपारपर्यंत कोणालाच मिळाली नव्हती. बुधवारी दुपारी एका व्यक्तीला दरीत पडलेली कार दिसली, तेव्हा अपघात उघडकीस आला. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
१५ तास शोधानंतर अपघात उघडकीस
लडभडोल बाजारात दुकान आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांची मुले सिमसमध्ये बारशाला गेली होती. तिथून परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बुधवार सकाळपर्यंत मुले घरी परतली नाहीत, तेव्हा कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुले एका दुकानात दिसली होती. सुमारे १५ तासांपासून मुले बेपत्ता होती. अखेर बुधवारी दुपारी दरीत कोसळलेली कार एका व्यक्तीला दिसली.
कारमधून सहा तरुणांना बाहेर काढून लडभडोल रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवाने कारमधील कोणीही जिवंत सापडले नाही. मृत पावलेले सर्व जण एकाच गावातील होते. त्यांची ओळख पटली आहे.
विधानसभेत शोक व्यक्त
अपघाताच्या कारणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेच्या कामकाजादरम्यान जोगेंद्रनगरचे आमदार प्रकाश राणा यांनी सभागृहाला अपघाताची माहिती दिली. सभागृहाच्या सदस्यांनी अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
Leave a Reply