सोन्याच्या दरात सध्या मोठी घसरण पाहायला मिळत असतानाच त्याच्या शुद्धतेवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोन्यात भेसळ करण्यासाठी चीनमधून एक नवा डाव टाकला जात असल्याचा दावा माध्यमांच्या अहवालात करण्यात आला आहे. या भेसळीमुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, सोन्याचे वजन वाढवण्यासाठी रेनियम नावाच्या जड धातूची पावडर मिसळली जात आहे. ही पावडर चीनमधून भारतात पाठवली जात असून, देशातील अनेक शहरांत तिचे विक्रेते असल्याचा दावा करण्यात आला आहे. या धातूची भेसळ केल्यानंतरही सोन्याच्या काही चाचण्यांमध्ये त्याची शुद्धता 24 कॅरेटपर्यंत दिसून आल्याचे तपासात समोर आले आहे.
बीआयएसलाही ओळख पटत नाही?
चीनमधून पाठवलेला हा धातू सोन्यात मिसळला, तर भारतीय मानक संस्थेलाही (बीआयएस) तो ओळखता येत नाही, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध सोने मिळत असल्याची खात्री देणाऱ्या चाचण्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांनी अधिक सावध राहण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.
या तपासादरम्यान चीनमधील शेन्झेन येथील एका प्रतिनिधीशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्या प्रतिनिधीने कंपनी रेनियम पावडरचे उत्पादन करत असल्याचा दावा केला. भारतातील अनेक शहरांत या पावडरचे विक्रेते असल्याचेही त्याने सांगितले. मुंबईतही एका विक्रेत्यामार्फत एक ग्रॅम रेनियम पावडरचा नमुना मिळवण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे.
जोधपूरमधील प्रयोगात काय समोर आले?
जोधपूरमध्ये एका सोनारासोबत केलेल्या प्रयोगात या भेसळीचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले. अहवालानुसार, 7.83 ग्रॅम वजनाच्या 24 कॅरेट सोन्यात एक ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आली. त्यानंतर सोन्याचे वजन 8.83 ग्रॅम इतके झाले. तरीही चाचणीत ते सोने 24 कॅरेट शुद्ध असल्याचे दिसून आले, असा दावा करण्यात आला आहे.
जगातील युद्धजन्य पार्श्वभूमीमुळे सोन्याच्या दरात सध्या मोठी पडझड पाहायला मिळत आहे. अशा काळात शुद्धतेबाबतचे हे दावे ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. सोने खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करावी आणि प्रमाणपत्राची तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
Leave a Reply