आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो एखाद्या चित्रपटामुळे नाही, तर एका खास इच्छेमुळे चर्चेत आहे. पडद्यावर कोणत्या खऱ्या व्यक्तीची भूमिका साकारायला आवडेल, असा प्रश्न विचारला असता नवाजुद्दीनने थेट ओशोंचे नाव घेतले.
ओशोंची विचारधारा, व्यक्तिमत्त्व आणि जगण्याची पद्धत आपल्याला आकर्षित करते, असे त्याने सांगितले. संधी मिळाली तर ओशोंची भूमिका नक्की साकारायला आवडेल, असेही तो म्हणाला. न्यूज १८ च्या रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना नवाजुद्दीनने ही इच्छा व्यक्त केली.
नेमके काय म्हणाला नवाजुद्दीन?
नवाजुद्दीन म्हणाला की, ओशोंची विचारधारा, त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची बोलण्याची लकब आणि त्यांची शैली आपल्याला प्रचंड आकर्षित करते. त्यामुळे कधी संधी मिळाली, तर त्यांची भूमिका आनंदाने साकारायला तयार आहे, असे त्याने म्हटले आहे.
त्याला चित्रपट दिग्दर्शनाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, दिग्दर्शनात आपल्याला अजिबात रस नसल्याचे त्याने स्पष्ट केले. आपल्याला कायम अभिनेता म्हणूनच काम करायचे असून एक चांगला कलाकार होण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असेही त्याने सांगितले.
ओशो कोण होते?
ओशो हे एक प्रसिद्ध भारतीय आध्यात्मिक गुरू आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचे खरे नाव चंद्र मोहन जैन होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३१ रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे झाला. ते भगवान श्री रजनीश या नावानेही ओळखले जायचे.
ओशो हे अध्यात्म, ध्यान, प्रेम, नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांवरील त्यांच्या शिकवणीसाठी प्रसिद्ध होते. १९७४ मध्ये त्यांनी पुण्यात एक आश्रम स्थापन केला, जिथे जगभरातून अनुयायी येऊ लागले. १९८१ मध्ये ते अमेरिकेत स्थलांतरित झाले, जिथे त्यांच्या अनुयायांनी ओरेगॉनमध्ये रजनीशपुरम कम्यूनची स्थापना केली. पुढे तो वादग्रस्त ठरला. कायदेशीर खटल्यानंतर १९८५ मध्ये त्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आणि ते भारतात परतले. १९ जानेवारी १९९० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.
Leave a Reply