मुंबईकरांना येत्या २१ नोव्हेंबरला एका सुरेल संध्याकाळचा अनुभव घेता येणार आहे. बालदिनानिमित्त वरळी येथील नेहरू सेंटरतर्फे ‘प्रसन्नतेचा गाव’ हा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लहान मुलांच्या निरागस आवाजातून उमटणारी गाणी आणि मराठी व हिंदीतील लोकप्रिय गीतांची जोड या मैफलीला रंगत आणणार आहे.
१५ बालकलाकार सादर करणार विविध गीतप्रकार
कार्यक्रमात १५ बालकलाकार विविध गीतप्रकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना, संगीत लेखन आणि दिग्दर्शन डॉ. वर्षा भावे यांचे आहे. गेल्या पाच दशकांपासून त्या बालगायकांना संगीताचे प्रशिक्षण देत असून अनेक कलाकारांना संगीत क्षेत्रात येण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. भावगीत, भजन, नाट्यगीत आणि लोकगीत अशा विविध प्रकारांतील गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.
अनुभवी वादकांची साथ
बालकलाकारांसोबत अनुभवी वादकांची संगीतसाथही या मैफलीला लाभणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन आणि संवादिनी वादन सोमेश नार्वेकर करणार आहेत. सिंथेसायझरवर अमित गोठीवरेकर आणि कौशिकी जोगळेकर, ऑक्टोपॅडवर सिद्धार्थ कदम, ढोलकी व ढोलकवर हनुमंत रावडे तर तबल्यावर निशाद करलगीकर साथ देणार आहेत.
Leave a Reply