मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री छाया कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिली आहे. सहजसुंदर आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या छाया कदम यांना आता रशियातील प्रतिष्ठित ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
भारत आणि रशिया यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झालेल्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान मिळाला आहे.
‘स्नो फ्लॉवर’मधील नंदाच्या भूमिकेचा गौरव
छाया कदम यांनी ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटात नंदा ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष दखल घेण्यात आली. त्यांना ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटात विविध संस्कृतींना जोडणारे समान धागे आणि एका जिवंत राष्ट्रीय व्यक्तिरेखेची प्रभावी निर्मिती केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
कोकण ते सायबेरिया असा अनोखा प्रवास
‘स्नो फ्लॉवर’ हा भारत आणि रशिया यांची सहनिर्मिती असलेला मराठी चित्रपट आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कोकणातील लाल माती आणि सायबेरियातील बर्फाच्छादित प्रदेश अशा दोन वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विश्वांचा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.
या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत वैभव मांगले यांनी दिग्या ही भूमिका साकारली आहे. तसेच सफू आलम आणि मनवा देवेंद्र भागवत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
छाया कदम यांची पोस्ट
छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘एक जबरदस्त आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे! माझ्या ‘स्नो फ्लॉवर’ या भारत-रशिया सहनिर्मित चित्रपटासाठी ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मला ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्नो फ्लॉवर’ या सिनेमाची गोष्ट कोकणातल्या लाल मातीत सुरू होऊन सायबेरियाच्या बर्फात एकरूप होते. हा सिनेमा आणि यातील माझी भूमिका माझ्यासाठी स्पेशल होती आणि कायमच राहील.’ छाया कदम यांनी ही पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
छाया कदम यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘लापता लेडीज’ आणि ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणाऱ्या छाया कदम यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता ‘स्नो फ्लॉवर’साठी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Leave a Reply