कार्तिकी एकादशी २० नोव्हेंबर रोजी आहे. यानिमित्त ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना रंगीबेरंगी विद्युत दिव्यांनी सजवण्यात आले असून फुलांच्या आकर्षक माळांनी परिसर सुशोभित करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. २० आणि २१ नोव्हेंबर रोजी ठाण्यात सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
मंदिरांत भक्तिमय वातावरण
कार्तिकी एकादशीनिमित्त ठाण्यातील मंदिरे, बाजारपेठा आणि वारकरी संप्रदायाने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरातील विविध भागांत अखंड हरिनाम सप्ताह, काकड आरती, हरिपाठ आणि दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंडळांनी आणि मंदिरांनी भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसाद तसेच फराळाच्या वाटपाचे नियोजन केले आहे. उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावरील ५१ फूट उंचीच्या भव्य विठ्ठल मूर्ती परिसरात विशेष पूजा आणि दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाजारपेठांमध्ये लगबग
एकादशीच्या उपवासासाठी लागणारे साबुदाणा, शेंगदाणे, भगर, रताळी आणि राजगिऱ्याच्या लाडूंची खरेदी करण्यासाठी ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. विठ्ठलाच्या पूजेसाठी आणि तुळशी विवाहाच्या सुरुवातीसाठी झेंडूची फुले, तुळशीची पाने, ऊस, आवळे आणि मातीच्या पणत्यांची दुकानेही सजली आहेत. मंदिरांमध्ये आणि दिंडी मार्गांवर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून नियोजन करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिंडी मार्गांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
Leave a Reply