गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अकोला: ८२ हजार शेतकरी पाच हजारांच्या अग्रिम मदतीपासून वंचित

अकोल्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मिळालेली नाही. आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर टीका करत हिवाळी अधिवेशनानंतर आंदोलनाचा इशारा दिला.

अकोला: ८२ हजार शेतकरी पाच हजारांच्या अग्रिम मदतीपासून वंचित

दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र अकोला जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत ही रक्कम जमा झालेली नाही. जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार पात्र शेतकऱ्यांपैकी हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सरकारच्या घोषणांचा लाभ प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार देशमुख यांची सरकारवर टीका

या मुद्द्यावर उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका केली. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख यांनी मदत वितरणातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. सरकारने दिलेले आश्वासन नेमके कोणासाठी होते, असा सवाल त्यांनी केला. पाच हजार रुपयांत भाजपच्या स्थानिक खासदार आणि आमदारांची दिवाळी साजरी झाली का, अशी टीकाही त्यांनी केली. २० सप्टेंबरला अकोल्यात आलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, २३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ३० सप्टेंबरला अकोल्यात आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हजारो शेतकरी प्रत्यक्ष मदतीपासून वंचित राहिल्याचे देशमुख म्हणाले.

हिवाळी अधिवेशनानंतर आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. अन्यथा हिवाळी अधिवेशनानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला. विदर्भात मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मागील चार महिन्यांत ६४, तर राज्यात नऊ महिन्यांत २२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance