बंगालच्या उपसागरात भीषण अशा चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ‘अक्वान’ (Cyclone Akvan) चक्रीवादळ आता अधिक शक्तिशाली बनले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अक्वान चक्रीवादळामुळे दक्षिण भारताच्या किनारी भागांमध्ये वातावरण अधिक खराब होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ 20 नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत उत्तर आंध्र प्रदेश, यानम आणि दक्षिण ओडिशा यांच्यामध्ये असलेल्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
वाऱ्याचा वेग ताशी 110 किमीपर्यंत
या दरम्यान हवेचा वेग प्रति तास 90 ते 100 किलोमीटर इतका जास्त असणार आहे. या काळात हवेचा वेग ताशी 110 किमीपर्यंत देखील जाऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अक्वान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर पडणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी
एकीकडे दक्षिण भारतामध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असतानाच दुसरीकडे उत्तर भारतामध्ये मात्र कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये दाट धुके पडणार असून, थंडीचा कडाका चांगलाच वाढणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार अक्वान पश्चिमोत्तर दिशेने पुढे सरकत आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी हे चक्रीवादळ मछलीपट्टनम आणि पुरीच्या समुद्र किनाऱ्याला पार करू शकते. त्यानंतर हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
राज्यात 19 नोव्हेंबर रोजी वातावरण पूर्णपणे निरभ्र आणि कोरडे राहणार असून, दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 20 नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबई या भागात वातावरण कोरडे राहील, परंतु विदर्भात मात्र पावसाची शक्यता आहे.
Leave a Reply