नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात नेमका कसा झाला
औद्योगिक वसाहतीतील कार्बन कंपनीसमोर म्हसोबा मंदिराजवळ मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. राजेश कृष्णा भोये (२५, रा. निशाणखडक, ता. पेठ, जि. नाशिक) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. दुसऱ्या दुचाकीवर महेश दिलीप क्षीरसागर (२१, रा. गायत्री कॉलनी, अशोकनगर, सातपूर) आणि धनंजय समाधान पगार (२१, रा. शिवाजीनगर, सातपूर) हे दोघे प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की राजेश भोये यांचा गंभीर दुखापतींमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. महेश क्षीरसागर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
परिसरात हळहळ; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्बन नाका परिसरात झालेल्या या भीषण अपघातामुळे औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Leave a Reply