नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपला शेतीमाल स्वतःच्या ब्रँडच्या नावाने विकता येणार आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळावा, त्याची गुणवत्ता सुधारावी आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडता यावे, या उद्देशाने येथील ग्रीन ग्रोथ अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग आणि पॅकिंग करून स्वतःचा व्यवसाय उभा करावा, हा यामागील उद्देश आहे.
## बाजारातील अडचणींवर उपाय
सध्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समित्यांवर अवलंबून राहावे लागते. बाजारभावातील चढ-उतार, योग्य खरेदीदार मिळण्याची अनिश्चितता आणि अपेक्षित भाव न मिळणे, अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. या अडचणी लक्षात घेऊन कंपनीने नंदुरबारात अत्याधुनिक प्री क्लिनिंग आणि सॉर्टेक्स मशिनची सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका, ज्वारी आणि सोयाबीन यांसह विविध प्रकारच्या धान्याची स्वच्छता, निवड, वर्गीकरण आणि प्रतवारी करता येणार आहे. त्यामुळे शेतीमालाची गुणवत्ता सुधारून तो बाजारपेठेत विक्रीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार करता येईल.
## स्वतःच्या ब्रँडने विक्रीची संधी
ग्रीन ग्रोथ अॅग्रोमध्ये शेतकऱ्यांना स्वच्छ आणि प्रतवारी केलेला शेतीमाल २५ आणि ५० किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये स्वतःच्या ब्रँडच्या नावाने पॅक करून घेता येणार आहे. कमी खर्चात शेतकरी आपल्या मालाला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव वाढवून घेऊ शकतात. ब्रँडच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
## साठवणूक आणि कर्जासाठी मार्गदर्शन
शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस सुविधांबाबतही शेतकऱ्यांना कंपनीमार्फत मार्गदर्शन केले जाते. वेअरहाऊसमध्ये साठवलेल्या शेतमालाच्या तारणावर कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील परिस्थितीनुसार आपल्या शेतमालाच्या विक्रीचा निर्णय घेणे अधिक सोयीचे होऊ शकते.
Leave a Reply