मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे के. के. गोस्वामी. ‘शक्तिमान’, ‘विकराळ और गबराळ’, ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘गुटुर गू’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र के. के. गोस्वामी यांचा यशस्वी कलाकार होण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कमी उंचीमुळे त्यांना आयुष्यात अनेकदा अपमान आणि नकाराचा सामना करावा लागला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही याच कारणामुळे अनेक अडचणी आल्या. नुकत्याच सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या लग्नाशी संबंधित काही धक्कादायक आठवणी सांगितल्या आहेत.
चित्रपटाच्या ऑफरमुळे मोडलेले लग्न
अभिनेत्याने सांगितले की, त्यांच्या वडिलांनी गावात त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले होते. तेव्हा त्यांनी होकार दिला होता. लग्नाला फक्त दोन-तीन महिने उरले असताना त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली. त्यांनी विचार केला की, ते नंतर लग्न करतील, पण त्यांना पुन्हा चित्रपट मिळणार नाही. जेव्हा त्यांनी नकार दिला, तेव्हा मुलीचे कुटुंबीय संतापले. त्यांच्यात खूप भांडण झाले. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी केली आहे आणि आता ते लोकांना काय उत्तर देणार. अभिनेत्याने सांगितले की, त्याच क्षणी त्यांचा धाकटा भाऊ तिथे आला. भावाला पाहून मुलीचे वडील म्हणाले की, माझ्या मुलीचे लग्न या मुलाशी लावा. त्यामुळे ज्या मुलीसोबत त्यांचे लग्न होणार होते, ती त्यांच्या भावाची बायको बनली.
मंदिरात झालेले लग्न आणि पोलिसांची चौकशी
के. के. गोस्वामी यांनी सांगितले की, नंतर त्यांना लग्न करण्याची इच्छा झाली, पण त्यांना अशा मुलीसोबत लग्न करायचे होते जी कुटुंबाची काळजी घेऊ शकेल. त्यामुळे त्यांच्या बहिणीने गावातील एका मुलीशी त्यांचे लग्न ठरवले होते. पण लग्नाआधी त्यांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या कमी उंचीबद्दल माहिती नव्हती. एक दिवस त्यांच्या लहान भावाने फोन करून आईची तब्येत बिघडल्याचे सांगत त्यांना गावाला बोलावून घेतले. के. के. घरी पोहोचले तेव्हा तिथे लग्नाची तयारी आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. नेमके काय सुरू आहे, असे त्यांनी भावाला विचारले असता, तुझेच लग्न ठरले आहे, असे त्याने सांगितले. मात्र लग्नासाठी गेल्यानंतर मुलीने आपल्याला पाहून नकार दिला तर खूप अपमान होईल, अशी भीती के. के. यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी वडील आणि भावाला एक अट घातली. आपण वरात घेऊन मुलीच्या घरी जाणार नाही, तर मुलीकडच्यांनी तिला मंदिरात घेऊन यावे, असे त्यांनी सांगितले. मुलीने लग्नास नकार दिला तर तिथूनच ट्रेन पकडून मुंबईला परत जायचे, असेही त्यांनी मनाशी ठरवले होते. के. के. गोस्वामी लग्नासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा तिथे मोठी गर्दी जमली होती. कमी उंची असलेल्या तरुणाचे लग्न होत असल्याचे समजल्याने अनेक लोक त्यांना पाहण्यासाठी आले होते. हे पाहून पोलीसही तिथे दाखल झाले. मुलाची उंची कमी आणि मुलगी उंच असल्याने काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी लग्न थांबवले. यानंतर पोलिसांनी पुजारी आणि वकिलांना बोलावले. लग्नासंबंधी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तसेच के. के. यांच्या पत्नीला तिच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत आहे का, अशी विचारणा करण्यात आली. तिने स्वतःच्या इच्छेने लग्न करत असल्याचे स्पष्ट केल्यानंतरच लग्न झाले.
Leave a Reply