अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी पिल्याशिवाय होत नाही. तणाव वाटला की चहा, कामात चहा, तर काही वेळा जेवणानंतर लगेच चहा अशी सवय अनेकांना लागलेली असते. दिवसभरात पाच ते सहा वेळा चहा प्यायल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. चहा पिल्यानंतर ताजेतवाने वाटते आणि काम करण्याचा उत्साह वाढल्यासारखे वाटते. मात्र आवडीने पिला जाणारा हाच चहा वारंवार आणि जास्त प्रमाणात पिला तर कालांतराने शरीरासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो. चहातील कॅफिन आणि साखर यामुळे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दिवसभरात दोन किंवा जास्तीत जास्त तीन वेळाच चहा प्यावा, असा सल्ला दिला जातो.
झोपेवर होणारा परिणाम
चहातील कॅफिन हे उत्तेजक द्रव्य आहे. त्यामुळे मेंदू जागृत राहण्यास मदत होते. पण दिवसभरात खूप जास्त प्रमाणात चहा पिला तर शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. वारंवार जाग येणे, शांत झोप न लागणे किंवा झोपेची गुणवत्ता खराब होणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी चहा पिणे टाळावे.
पचन आणि लोहाच्या पातळीवर परिणाम
चहासोबत तेलकट पदार्थ किंवा बिस्किटे खाण्याची सवय अनेकांना असते. चहातील कॅफिन आणि इतर घटकांमुळे पोटात जळजळ, आम्लपित्त किंवा मळमळ वाढण्याची शक्यता असते. आम्लपित्ताच्या त्रासाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी चहाचे सेवन मर्यादित ठेवावे. खूप कडक चहा किंवा वारंवार दुधाचा चहा पिणे टाळावे. चहामध्ये टॅनिन आणि इतर पॉलिफेनॉल घटक असतात. त्यामुळे अन्नातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या लोहाच्या शोषणावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच किंवा जेवणाच्या आधी चहा पिऊ नये. अतिप्रमाणात चहा पिल्याने लोहाची कमतरता किंवा हिमोग्लोबिन कमी होऊ शकते.
हृदयाचे ठोके वाढणे
चहातील कॅफिनचे प्रमाण जास्त झाले की काहींच्या हृदयावर त्याचे परिणाम दिसून येतात. हात थरथरणे, घाबरल्यासारखे वाटणे, बेचैनी किंवा हृदयाचे ठोके वेगाने वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे कॅफिनबाबत संवेदनशील असलेल्या व्यक्तींनी चहाचे सेवन करू नये. चहा प्यायचाच असेल तर अतिशय कमी प्रमाणात प्यावा. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply