लहान मुलांच्या आधार कार्डातील बायोमेट्रिक माहिती वेळेत अद्ययावत करणे आवश्यक असून, ही सेवा सध्या मोफत उपलब्ध आहे. पाच ते सतरा वयोगटातील मुलांसाठी ही मोफत सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे ज्या पालकांच्या मुलांनी पाच किंवा पंधरा वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी ही मुदत चुकवू नये.
पाच आणि पंधरा वर्षी अपडेट का आवश्यक?
पाच वर्षांखालील मुलांना निळ्या रंगाचे बाल आधार कार्ड दिले जाते. त्यावर फक्त फोटो आणि आधार क्रमांक असतो; बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचा स्कॅन त्यावर नसतो. लहान मुलांची बोटे लहान असतात आणि ती बदलत राहतात, त्यामुळे सुरुवातीला बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही. मूल मोठे होताना चेहरा बदलतो आणि बोटे मोठी होतात, त्यामुळे जुनी माहिती अपुरी पडते. म्हणूनच मूल पाच वर्षांचे झाल्यावर एकदा आणि पंधरा वर्षांचे झाल्यावर पुन्हा एकदा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट करावे लागते. यालाच एमबीयू असे म्हणतात.
बालदिनानिमित्त आवाहन
बालदिनानिमित्त युआयडीएआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून पालकांना आवाहन केले आहे. त्यात म्हटले आहे की, या बालदिनानिमित्त आपल्या मुलाच्या डिजिटल ओळखीची आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घ्या. मुलासाठी बाल आधार काढा आणि ते पाच आणि पंधरा वर्षांचे झाल्यावर अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण करतील, याची खात्री करा. पाच ते सतरा वयोगटातील मुलांसाठी ही सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत विनामूल्य उपलब्ध आहे.
अपडेट कसे करावे?
अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे. जवळच्या आधार केंद्राला थेट भेट देता येते किंवा वेळ वाचवण्यासाठी आधी अपॉइंटमेंट बुक करता येते. यासाठी युआयडीएआयच्या संकेतस्थळावर किंवा bookappointment.uidai.gov.in वर जाऊन जवळचे केंद्र शोधून वेळ बुक करता येते. मुलाचे आधार कार्ड सोबत न्यावे आणि मुलाला सोबत नेणे आवश्यक आहे, कारण मुलाशिवाय हे काम होणार नाही. बऱ्याचदा इतर कागद लागत नाहीत, तरी मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि आई-वडिलांचे आधार कार्ड सोबत ठेवावे. केंद्रावर मुलाचा नवीन फोटो काढला जातो, दहाही बोटांचे ठसे आणि दोन्ही डोळ्यांचा आयरीस स्कॅन घेतला जातो. हे सुमारे पाच मिनिटांचे काम आहे. काम झाल्यावर मिळणारी पावती आणि त्यावरील युआरएन क्रमांक जपून ठेवावा; त्या क्रमांकावरून काम कुठपर्यंत आले, ते तपासता येते. मुलाचे आधार कार्ड निळे असेल आणि मूल पाच वर्षांचे झाले असेल, तर मोफत सुविधा असतानाच केंद्रावर जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply