बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुणे विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक रात्रीतून बदलले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक ऐनवेळी बदलले. प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलली असून वेळही बदलली आहे.

पुणे विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक रात्रीतून बदलले

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक ऐनवेळी बदलण्यात आले आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या सत्र परीक्षांच्या नियोजनात झालेल्या या बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली आहे. सुरुवातीला नियमित आणि बॅकलॉग परीक्षांचे पेपर एकाच दिवशी, एकाच वेळी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वेळापत्रकात रात्रीतून बदल करण्यात आला.

द्वितीय वर्षाची परीक्षा २५ नोव्हेंबरपासून

द्वितीय वर्षाची परीक्षा १७ नोव्हेंबरऐवजी २५ नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी अचानक जाहीर करण्यात आला. तर मंगळवार, १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रथम वर्षाच्या परीक्षेची वेळ दुपारी दोन ते सायंकाळी पाचऐवजी सकाळी दहा ते दुपारी एक अशी बदलण्यात आली. सुधारित वेळापत्रक परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी सायंकाळी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली.

विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर मंगळवारी नमूद असलेला प्रथम वर्षाचा पेपरही ऐनवेळी रद्द करून २५ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या परीक्षा विभागांना विश्वासात न घेता हे बदल केले, त्यामुळे संभ्रम अधिक वाढला. पत्रकारिता अभ्यासक्रम असलेल्या काही महाविद्यालयांनाही परीक्षेच्या वेळेतील बदलाची पूर्वकल्पना नव्हती. परिणामी जुन्या वेळापत्रकानुसार तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला.

सुट्या २६ पर्यंत, मग परीक्षा आधीच कशा?

विद्यापीठाने दिवाळीच्या सुट्या २६ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केल्या आहेत. या कालावधीत परीक्षा किंवा अन्य शैक्षणिक कामकाज करू नये, अशी भूमिका विद्यापीठातील कर्मचारी आणि प्राध्यापकांनी वरिष्ठांकडे मांडल्याचे समजते. असे असताना सुट्या संपण्यापूर्वीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करून १७ नोव्हेंबरपासून परीक्षा घेण्याचे नियोजन कसे करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परीक्षा नियोजनातील या विसंगतीबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रथम वर्षाचा परीक्षार्थी अभिमन्यू पाटील याने सांगितले की, वेळापत्रकातील गोंधळामुळे सर्वच विद्यार्थ्यांची धावपळ झाली. परीक्षा केंद्रावर दोन्ही वर्षांचे विद्यार्थी एकत्र आले, आसन क्रमांकांची व्यवस्था नव्हती. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नियोजनाअभावी झालेल्या या कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे त्याने नमूद केले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance