नाशिकमध्ये येत्या गुरुवारीपासून पाच दिवस युवकांच्या कलेचा महोत्सव रंगणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणात बाविसावा राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातील २७ विद्यापीठांमधील तरुण कलावंत सहभागी होतील.
१,१२३ युवा कलावंतांचा सहभाग
या महोत्सवात ४८६ विद्यार्थिनी आणि ६३७ विद्यार्थी असे एकूण १,१२३ युवा कलावंत सहभागी होणार आहेत. संघव्यवस्थापकांसह जवळपास १,२५० व्यक्ती या पाच दिवसांत विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थित राहतील. महोत्सवासाठी विद्यापीठाच्या प्रांगणात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने विशेष नगरी उभारण्यात आली आहे.
उद्घाटन आणि पाच दिवसांचा कार्यक्रम
‘गोदावरी मंडपम’ या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे आणि मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यावेळी उपस्थित राहतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचीही उपस्थिती असेल.
महोत्सवासाठी चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, प्रा. वसंत कानेटकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि शिल्पकार राम सुतार यांच्या नावाने पाच मंच सज्ज करण्यात आले आहेत. संगीत, नृत्य, वाड्मयीन, रंगमंचीय कला, ललित कला, लघुपट आणि शोभायात्रा अशा सात प्रमुख कला प्रकारांतर्गत एकूण २९ स्पर्धा होतील.
गुरुवारी सकाळी साडेसात वाजता ज्ञानस्त्रोत केंद्र ग्रंथालयापासून यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत निघणाऱ्या भव्य शोभायात्रेने महोत्सवाचा शुभारंभ होईल. औपचारिक उद्घाटन सकाळी अकरा वाजता होईल. पहिल्या दिवशी भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद आणि सुगमसंगीत स्पर्धा होतील. शुक्रवारी भारतीय समूहगान, पाश्चिमात्य गायन व वाद्यसंगीत, एकांकिका, वक्तृत्व, मातीकला, चिकटकला, रांगोळी आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा रंगतील. शनिवारी भारतीय शास्त्रीय नृत्य, नाट्यसंगीत, एकांकिका, वादविवाद, व्यंगचित्रे, पोस्टर मेकिंग, पाश्चिमात्य समूहगान, शास्त्रीय तालवाद्य, लघुपट, स्थळ चित्र आणि मूकभिनय या कलाप्रकारांची मेजवानी असेल. रविवारी भारतीय लोकसमूह नृत्य, शास्त्रीय गायन व स्वरवाद्य, प्रहसन, स्थापना, स्थळ छायाचित्रण आणि नकला या स्पर्धा होतील. सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून चित्रमहर्षी दादासाहेब फाळके मंचावर समारोप व बक्षिस वितरण समारंभ होईल.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी आयोजन, स्वागत, उद्घाटन व समारोप, भोजन, निवास, आरोग्य, सुरक्षा, वित्त आणि परीक्षण अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी एकूण ४२ समित्या गठित करण्यात आल्या आहेत. लोकभवनच्या निरीक्षण व वित्त समितीने विद्यापीठाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.
Leave a Reply