जळगावच्या ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या उत्सवाच्या मिरवणुकीत अडथळे येऊ नयेत, यासाठी महापालिकेने रथमार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य दिले आहे. रथाच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून ते बुजवण्याच्या कामाला सोमवारी (ता. १६) सुरुवात झाली. जुने जळगाव, बोहरा गल्लीसह अन्य प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवण्यात येत आहेत.
दीडशे वर्षांची परंपरा
संत आप्पा महाराज यांनी हा रथोत्सव सुरू केला. कार्तिक शुक्ल एकादशीला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात प्रभू श्रीरामाचा रथ आणि विविध वाहनांची मिरवणूक काढली जाते. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि भक्तीचा संदेश देणारा हा उत्सव आहे. रथमार्गावरील रस्त्यांची स्थिती या उत्सवासाठी महत्त्वाची ठरते.
स्वच्छतेवरही भर
रथोत्सवासाठी शहरातील स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मिरवणूक मार्गावरील कचरा उचलणे, रस्त्यांची स्वच्छता, नाले आणि गटारींची सफाई तसेच आवश्यक ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्याचे निर्देश उपमहापौरांनी संबंधित विभागांना दिले आहेत. भाविकांना मिरवणुकीदरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्वच्छता आणि आवश्यक नागरी सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून रथमार्गावरील इतर सुविधा आणि दुरुस्तीची कामेही सुरू झाल्याची माहिती शहर अभियंता आर. टी. पाटील यांनी दिली.
Leave a Reply