हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत विविध विभागांतील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी विभागप्रमुखांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
## ई-फाईल प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर
शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून कागदपत्रांचा निपटारा जलद गतीने कसा करता येईल, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ई-फाईल प्रणालीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. ‘आपले सरकार’ पोर्टलवर नागरिकांकडून आलेल्या अर्जांचे आणि तक्रारींचे वेळेत निवारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. लोकायुक्तांकडील प्रकरणे आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निरसन करण्यास सांगण्यात आले.
प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक पडताळणी करूनच अदा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. वेतन काढताना बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले.
## जलसंधारणाच्या कामांना गती
दुष्काळामुळे डिसेंबरनंतर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला असून नाला खोलीकरण, गाव तलावातील गाळ काढणे, पाझर तलाव आणि सिंचन तलावांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, कृषी अधिकारी अतुस वायसे, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, विपूल भागवत आणि संदीप सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले आणि कार्यकारी अभियंता राजू नरवाडे उपस्थित होते.
Leave a Reply