जळकोट तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यंदा खरीप हंगामाला बसलेला फटका, घसरलेली पाणीपातळी आणि विहिरींनी गाठलेला तळ यामुळे रब्बी हंगामातील पेरणीवर थेट परिणाम झाला आहे. तालुक्यातील रब्बी पेरणी क्षेत्रात यंदा कमालीची घट झाल्याचे तालुका कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
## पेरणी क्षेत्रात किती घट?
तालुक्याचे सरासरी रब्बी क्षेत्र ३,९४६ हेक्टर आहे. २०२५-२६ मध्ये ६,७१७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. मात्र चालू वर्षी केवळ ६०३.४० हेक्टरवरच रब्बीची पेरणी होऊ शकली आहे, अशी माहिती उपकृषी अधिकारी ज्ञानोबा हंगरगे यांनी दिली. ज्यांच्याकडे विहीर किंवा बोअर आहे, त्यांनीही घसरलेल्या पाणीपातळीचा विचार करून अत्यल्प पाण्यावर रब्बी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
झालेल्या पेरणीची पिकनिहाय आकडेवारी अशी आहे: हरभरा १६२ हेक्टर, रब्बी ज्वारी २९७.४० हेक्टर, हायब्रिड ज्वारी ९१.८ हेक्टर, भुईमूग १२ हेक्टर, करडई आणि इतर पिके २० हेक्टर, गहू २०.२० हेक्टर. एकूण पेरणी ६०३.४० हेक्टर इतकी झाली आहे.
## चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
खरीप हंगाम पावसाअभावी गेला, तरी परतीचा पाऊस पडेल आणि रब्बी मोठ्या प्रमाणात घेता येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण दिवाळी होऊन गेली तरी पावसाचा पत्ता नसल्याने ही आशाही मावळली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीचे पीक यशस्वी झाल्यास कुटुंबाच्या भाकरीसाठी ज्वारी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा उपलब्ध होत असे. यंदा मात्र पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने पेरणी खोळंबली आहे. परिणामी आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता असून, येणारे सात-आठ महिने कसे काढायचे, हा प्रश्न बळिराजापुढे उभा राहिला आहे.
Leave a Reply