धाराशिव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने पेरणीला मोठा फटका बसला आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली नाही. परिणामी, जिल्ह्यात आतापर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या केवळ ११ टक्केच पेरणी पूर्ण झाली असून, शेतीचे अर्थकारण संकटात सापडले आहे.
चार लाख हेक्टरपैकी फक्त ४३ हजार हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख १७ हजार हेक्टर आहे. मात्र, आतापर्यंत प्रत्यक्षात केवळ ४३ हजार ४२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दरवर्षी परतीच्या पावसानंतर जमिनीत ओल निर्माण झाल्यावर शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांची पेरणी करतात. यंदा मात्र पावसाने साथ न दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी रखडली आहे.
गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून हरभऱ्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, पेरणीच्या काळात पाऊस न झाल्याने यंदा हरभऱ्याचे क्षेत्रही प्रभावित झाले आहे.
ज्वारी, गहू, हरभरा — सगळीकडेच घट
जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ६२ हजार ५०९ हेक्टर असून, आतापर्यंत केवळ २६ हजार ५१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे ज्वारीपासून मिळणाऱ्या कडब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आगामी काळात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.
गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र २५ हजार ८५५ हेक्टर असून, आतापर्यंत एक हजार २७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख आठ हजार ५७३ हेक्टर असताना केवळ १३ हजार ६४६ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तीळ, सूर्यफूल आणि मका या पिकांकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
पाणी असलेल्यांनी पेरणी केली, स्प्रिंकलरचा आधार
कोरडवाहू क्षेत्रात ओलीअभावी पेरणी झालेली नाही. दुसरीकडे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन भिजवून पेरणी केलेली आहे. या पिकांची उगवण झाली असून, ती जगविण्यासाठी स्प्रिंकलद्वारे पिकांना पाणी दिले जात आहे.
Leave a Reply