आपण अनेकदा आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना रेल्वे स्थानकावर सोडायला किंवा घेण्यासाठी जातो. मात्र एका तरुणासोबत घडलेली एक वेगळीच घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. एक मुलगा आपल्या वडिलांना ट्रेनमध्ये बसवून घरी परतत असताना स्टेशनच्या बाहेर टीसीने त्याला थांबवले. त्यानंतर जे घडले, त्यावरून रेल्वेच्या नियमांबद्दल सोशल मीडियावर चर्चा आणि वाद सुरू झाला आहे.
नेमके काय घडले?
सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. पिंकी प्रज्ञा नावाच्या एका युजरने तिच्या चुलत भावाशी संबंधित एक घटना पोस्ट करून शेअर केली. पिंकीने सांगितले की, तिचा चुलत भाऊ त्याच्या वडिलांना रेल्वेने निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेला होता. गाडी सुटल्यानंतर तो स्थानकाच्या आवारातून बाहेर पडत असताना एका टीटीईने त्याला थांबवले आणि त्याच्याकडे तिकीट मागितले. पिंकीने लिहिलेल्या पोस्टनुसार तिच्या भावाने टीटीईला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला की तो ट्रेनमधून प्रवास करून आलेला नाही. तो फक्त आपल्या वडिलांना ट्रेनमध्ये सोडायला आला होता आणि आता परत घरी जात होता. मात्र टीटीईने त्याचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले नाही. टीटीईचा आरोप होता की, स्टेशनवर नुकतीच एक ट्रेन आली आहे आणि हा तरुण विनातिकीट प्रवास करून त्यातून खाली उतरला आहे.
पिंकीने उपस्थित केलेले प्रश्न
घडलेल्या प्रकाराबद्दल पिंकीने प्रश्न उपस्थित केले की, रेल्वे स्टेशनवर दिवसभरात हजारो ट्रेन येतात आणि जातात. मग अशावेळी स्टेशनच्या बाहेर कोणी पडत आहे, याचा अर्थ असा होत नाही की तो ट्रेनमधून उतरलेला आहे. हे कितपत योग्य आहे? आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर येणाऱ्या लोकांना अशा अडचणींचा सामना करावा लागेल का, असा प्रश्न तिने उपस्थित केला. तिने असेही विचारले की, एखाद्याला प्रवासी असल्याचे गृहीत धरून त्याचे म्हणणे नीट ऐकून न घेता दंड आकारणे कितपत योग्य आहे? प्लॅटफॉर्म तिकीट ही व्यवस्था अनावश्यक प्रवेश नियंत्रित करण्यासाठी आहे की सामान्य लोकांकडून दंड वसूल करण्याचे आणखी एक कारण बनली आहे, असा सवालही तिने केला.
युजर्सची प्रतिक्रिया
पिंकीची पोस्ट व्हायरल होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. बहुतांश युजर्सनी तिच्या मताशी असहमती दर्शवली आणि तिला रेल्वेच्या नियमांची आठवण करून दिली. रेल्वेचे नियम नीट समजून न घेता त्यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन प्रकारच्या तिकिटांमधील फरक सोप्या शब्दांत स्पष्ट करत एका युजरने लिहिले की, रेल्वेचे तिकीट प्रवाशांसाठी असते, तर प्लॅटफॉर्म तिकीट अशा लोकांसाठी असते जे आपल्या प्रियजनांना निरोप देण्यासाठी किंवा त्यांना आणण्यासाठी येतात. जर तसे नसते, तर रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटे जारीच का केली असती, असा सवाल त्यांनी केला. एकंदरीत पिंकीला तिने लिहिलेल्या पोस्टवरून चांगलेच ट्रोल केले गेले.
Leave a Reply