दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की नाही, यावरची चर्चा थांबायचं नाव घेत नाही. सुनेत्रा पवार यांच्या गटातील नेते विलीनीकरणाबाबत नवनवीन दावे करत आहेत. काल दिवसभरात शरद पवार यांचा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होईल, असा दावा करण्यात आला. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत विलीनीकरणावर आपली भूमिका मांडली. विलीनीकरण होऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विलीनीकरणाचा अडथळा नेमका काय आहे, हेही त्यांनी सांगितलं.
विलीनीकरणावर परखड मत
राऊत म्हणाले की, विलीनीकरणावर त्यांनी परखड मत मांडलं आहे. शरद पवार यांच्यावर आपलं प्रेम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पक्षाला मार्गदर्शन करणारे आपण नाही, असंही ते म्हणाले. मात्र जनतेच्या भावना व्यक्त करणारा लेख आपण लिहिला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं. विलीनीकरणाचा खेळ थांबला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वजण इंडिया आघाडीत आहेत, त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी कडक भूमिका घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
अमित शहा यांचे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे पक्ष वाऱ्यावर असल्याचं राऊत म्हणाले. पक्ष खरंतर शरद पवार यांचा आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव ठाकरे यांचा आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेससह हे तीन प्रमुख पक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षाही ठामपणे आपण सांगत होतो की, विलीनीकरण कधीही होणार नाही, असं राऊत म्हणाले. विलीनीकरण राजकीय, भावनिक आणि नैतिकदृष्ट्या शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कोणी कोणाचं नेतृत्व मान्य करायचं, हाच खरा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते आहेत आणि आपण त्यांना नेते मानतो, असं त्यांनी सांगितलं. नेतृत्व कोण करणार, हाच विलीनीकरणातला मुख्य अडथळा असल्याचं त्यांनी नमूद केलं.
ऑपरेशन टायगरवरही भाष्य
उदय सामंत यांनी केलेल्या ऑपरेशन टायगर या वक्तव्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. कोण काय बोलतं, याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. त्यांच्या पक्षाची अवस्था पाहता त्यांना स्वाभिमान गुंडाळून काम करावं लागत असल्याचं राऊत म्हणाले. दोन्ही पक्ष अमित शहा यांचे असून त्यांना विचारधारा आणि भूमिका नसल्याचं त्यांनी म्हटलं. हवेची झुळूक आली की सर्व उडून जातील, सत्तेच्या आधारावर सर्व जोडलेले असल्याचं ते म्हणाले.
ऑपरेशन टायगर म्हणजे आम्ही वाघ आहोत, हे ते मान्य करत असल्याचं राऊत म्हणाले. त्यांच्यासारखे इकडून तिकडे उड्या मारणारे आपण नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी आता त्यांचा पक्ष सांभाळावा, असा सल्ला राऊत यांनी दिला. अमित शहा यांचे दोन पक्ष असून त्यांनी ते सांभाळावेत, असंही ते म्हणाले.
Leave a Reply