मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही जिवंत वाचू शकले नाही. अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. त्यातच आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यातून त्यांनी थेट मोठी मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशाचे गृहमंत्री अमित शाह पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे समजते. पुणे जिल्हा परिषदेत सत्ता असल्याने दादांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांनी पुतळा उभारला, याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
रिंग रोडला नाव देण्याची मागणी
रोहित पवार यांनी पुढे विचारले आहे की, अजितदादांमुळे राज्याच्या सत्तेत मंत्रीपदे उपभोगणाऱ्यांना पुणे रिंग रोडला दादांचे नाव असावे असे वाटत नाही का? अजितदादांचे राज्याच्या विकासातील योगदान अमूल्य होते, तसेच दादा सुमारे दशकभराहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, असे त्यांनी नमूद केले आहे. तरीही दादांचे नाव एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देऊ नये, अशी काही व्यक्तींची भूमिका आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
केवळ पुतळा अनावरणापुरते दादांचे कर्तृत्व मर्यादित करण्याऐवजी पुणे रिंग रोडला अजितदादांचे नाव देण्याची आणि दादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा शाह यांनी केली तर अधिक बरे राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
अन्यथा दादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिंग रोडला नाव देण्यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. सोबतच दादांचा घात की अपघात, याबाबतचे सत्य जाणून घेण्याचे आपले प्रयत्न चालूच राहतील, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रोहित पवार यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. अजित पवार यांचा अपघात की घातपात, याची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार मागील काही दिवसांपासून करत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चाही मागील काही दिवसांपासून रंगत आहे.
Leave a Reply