येवला तालुक्यातील चांदगाव येथील मजूर प्रतीक मोरे यांच्या झोपडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागून संपूर्ण संसार खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांनी मित्रांच्या सहकार्याने या कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
## मदतीचा ओघ
या घटनेची माहिती मिळताच नारायणमामा शिंदे व किशोर कुमावत यांनी मोरे वस्तीवर जाऊन जळीतग्रस्त मोरे कुटुंबाची भेट घेतली आणि आगीमुळे झालेली परिस्थिती पाहून कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुसऱ्याच दिवशी जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे व नीलिमा शिंदे यांनी मोरे कुटुंबाला संसारोपयोगी साहित्य दिले. समितीचे उपाध्यक्ष किशोर कुमावत यांनी महिनाभर पुरेल एवढा किराणा व कपड्यांची मदत केली. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भोलानाथ लोणारी, सचिव राजेंद्र वडे, नारायण रायजादे, जनकल्याण सेवा समितीचे सूरज मलकरवा, शशिकांत मालपुरे, स्वप्नील शिंदे, गोविंदा शिंदे व गायत्री चौरे यांनी रोख मदत केली.
## कुटुंबासमोर उभारणीचे आव्हान
सुदैवाने मोरे कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचले; मात्र त्यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दिवाळीसाठी साठवून ठेवलेले अन्नधान्य, कपडे आणि संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू भस्मसात झाल्या. पुन्हा संसार कसा उभा करायचा, असा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर होता. अशा कठीण प्रसंगी जनकल्याण सेवा समिती व श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाने मदतीचा हात दिला. नारायण शिंदे, किशोर कुमावत, सूरज मलकरवा, राजेंद्र वडे, नारायण रायजादे, शशिकांत मालपुरे, शिवाजी लोणारी व सचिन वखारे यांच्या मदतीमुळे मोरे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. जनकल्याण सेवा समितीने केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply