पिंपळगाव बसवंत येथील प्रियांका मोहिते यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या सियाल पॅरिस फूड बिझनेस २०२६ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले. नमो ड्रोन दीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहिते यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ड्रोन तंत्रज्ञानातून शेतीत बदल
मोहिते या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) स्वयंसहायता समूहाच्या सदस्या आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणीसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी ग्रामीण महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत.
जागतिक व्यासपीठावर भारताचे सादरीकरण
भारत सरकार आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) यांच्या निमंत्रणावरून त्यांना या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचे उपयोग, ग्रामीण महिलांची उद्योजकीय क्षमता आणि महिला सक्षमीकरणातील त्यांचे योगदान जागतिक व्यासपीठावर मांडले. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. त्यांच्या सत्कारावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील उपस्थित होते.
Leave a Reply