पश्चिम इराणमध्ये इराकच्या सीमेजवळ गॅस रिफायनरीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटली. या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणची सरकारी माध्यमसंस्था आयआरएनएने या अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
हा अपघात अब्दनान आणि देहलोरानला जोडणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे की, बस जेव्हा उलटली तेव्हा ती गॅस रिफायनरीच्या दिशेने जात होती आणि तिच्यामध्ये कर्मचारीही होते.
बचावकार्य आणि तपास सुरू
अपघातानंतर आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. अब्दनान काऊंटीचे गव्हर्नर बेहजाद नूरमोहम्मदी यांनी शनिवारी रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना सांगितले की, जखमींना इलम, देहलोरान, देझफुल आणि अब्दनान येथील विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ३२ जवानांचा समावेश असलेली १२ बचाव पथके सहा रुग्णवाहिकांसह घटनास्थळी पोहोचली होती.
बस पलटण्यामागील नेमके कारण काय, याबाबत अद्यापपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही. पण अपघाताचे कारण शोधण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते, याकडे लक्ष लागले आहे.
रस्ते अपघातांची गंभीर स्थिती
इराणमध्ये रस्ते अपघात प्रकरणे गंभीर होत चालली आहेत, असे या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रस्ते प्रवासाची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर अनेकदा असे प्राणघातक रस्ते अपघात झाले आहेत. इराणच्या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या काही आकडेवारीनुसार मार्चपर्यंत या देशामध्ये रस्ते अपघातात सुमारे २० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी आणि नागरिकांनी या अपघाताच्या घटनेनंतर सरकारचा निषेध केला असून घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
Leave a Reply